पॅन कार्ड बहुतेक वेळेस बॅंकेपासून ते इतर महत्त्वाच्या कामांमध्ये आवश्यक असते. परंतु करोनाच्या संकटामुळे आपण ते तयार करून घेण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. मात्र आता काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण आपण घरी बसून पॅन कार्ड सहज तयार करू शकतो आणि तेही केवळ 10 मिनिटांत. याला “इन्स्टंट पॅन कार्ड’ असेही म्हणतात.
इन्स्टंट पॅन ही मूळ पॅन कार्ड म्हणजेच ई-पॅनची सॉफ्ट कॉपी आहे. हे देखील सरकारी कामात पूर्णपणे वैध आहे. अर्ज केल्याच्या 10 मिनिटांच्या आत प्राप्त केले जाऊ शकते. ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाइल आधारकार्डला जोडलेला असल्यास या सुविधेचा लाभ घेता येतो.
इन्स्टंट पॅन कार्डच्या अर्जासाठी www.incometaxindiaefiling.gov.in/home वर भेट द्या. येथे Quick Links मध्ये आधार पर्यायाद्वारे Instant PAN through adhaar वर क्लिक करा. तसेच https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN वर देखील भेट देऊ शकता. येथे Get New PAN वर क्लिक करा. हे एक नवीन पृष्ठ उघडेल. आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. आता जनरेट आधार ओटीपी वर क्लिक करा.
कोड नोंदणीकृत मोबाइल नंबरवर दिसेल तो भरा. आता आपल्या आधार तपशीलांची माहिती द्या. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नावनोंदणी क्रमांक तयार केला जाईल. ते 15 अंकांचे असेल. यानंतर अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर संदेश येईल, ज्यामध्ये नावनोंदणी क्रमांक असेल. एकदा पॅन वाटप झाल्यानंतर ई-पॅन डाऊनलोड करता येईल. ई-पॅन पीडीएफ स्वरूपात असेल. जर आपला ई-मेल आयडी आधारसह नोंदणीकृत असेल तर ई-पॅन देखील आपल्याला ईमेलद्वारे पाठविला जाईल. इन्स्टंट पॅनसाठी कोणतीही फी आकारली जात नाही.