अयोध्येनंतर आता काशी, मथुरा भाजपाच्या रडारवर

खासदार विनय कटीयार यांची माहिती, पुन्हा संघर्षास तयार असल्याचे संकेत

नवी दिल्ली: दीर्घकालीन संघर्षानंतर आयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. मात्र त्याचवेळी काशी आणि मथुरा मंदिराचा वाद भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर आहेच. पक्ष ते उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय कटियार यांनी रविवारी सांगितले.

अयोध्या तो एक झांकी है काशी मथुरा बाकी है ही संघ परिवार आणि अन्य हिदुत्ववादी संघटनांची 90च्या दशकात घोषणा होती. अयोध्येतील मंदिर पूर्ण होत असताना काशी आणि मथुरा हे तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत कायम आहेत का? असा प्रश्‍न त्यांना विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले, काशी आणि मथूरेत मंदिर उभारणी हे विषय आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आहेतच. आम्ही बसून त्यावर चर्चा करून आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. “आउटलूक’ या नियतकालिकाशी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमीपूजन पाच ऑगस्टला होत आहे. त्यामुळे मंदिर उभारणीच्या कामाला वेग येईल. त्यानंतर राम मंदिर उभारणीकडे लक्ष देण्याची कोणतीही गरज आहे, असे मला वाटत नाही. शिलापूजन झाल्यानंतर आम्ही काशी आणि मथुरा मंदिर उभारण्यासाठी जनमत एकत्र करण्यास सुरवात करु.

पक्षामध्ये याबाबत यापुर्वीच चर्चा झाली आहे. काशी, मथुरा आणि अयोध्या या तीन पवित्र स्थळांना परत द्यावे, ही आमची मागणी कायम आहे. अयोध्येची मागणी पूर्ण झाली आता काशी विश्‍वनाथ अणि कृष्णजन्मभूमीसाठी प्रयत्न करावे लागतील.
या मशिदींना प्रार्थनास्थळे कायदा 1991 अन्वये संरक्षण आहे. पण मशीद तर तेथून हटवलीच पाहिजे. वाट पाहा आणि काय होते ते पहा, असे ते म्हणाले.

काशी आणि मथुरेच्या मंदिराशी आमचा संबंध नसल्याचे विहिंप आणि भाजपाचा संबंध नाही असे त्यांच्या नेत्यांनी म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, रामजन्मभूमी मंदिराची चळवळ भाजपाच्या नेतृत्वाखाली झाली. आता अयोध्येनंतर हे दोन विषय माझ्या रडारवर आहेत. या दोन्ही ठिकाणचे न्यायलयीन खटले अलाहाबाद उच्च न्यायलयात प्रलंबीत आहेत, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही ते पुढे आणण्याचे प्रयत्न करु.

रामजन्मभूमी बाबरी मशीद वादात देशांत मोठा रक्तपात झाला. जातीय दंगली उसळल्या असे विचारता, ते म्हणाले, या उद्दीष्टासाठी आम्ही मरण्यासही तयार आहोत. आणखी अनेक जण मरण्यासाठी पुढे येतील,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.