…आता कायमस्वरूपाचे येणारे अंधत्व टाळता येणे शक्‍य

जपानमधील नेत्रतज्ज्ञांचे राष्ट्रीय परिषदेमध्ये माहिती

पुणे – डोळ्यांची मुख्य रक्‍तवाहिनी बंद पडल्यानंतर त्या व्यक्‍तीला अंधत्व येऊ शकते. परंतू, आता “टीपीए’ हे इंजेक्‍शन दिल्यामुळे डोळ्याच्या मुख्य रक्‍तवाहिनीत असलेल्या गाठी विरघळण्याची नवी शस्त्रक्रिया अस्तित्वात आली आहे. त्यामुळे कायमस्वरूपाचे येणारे अंधत्व टाळता येणे शक्‍य झाले आहे. या शस्त्रक्रियेच्या पद्धतीमुळे जगभरात 30 ते 40 टक्‍के रुग्णांना या पद्धतीचा उपयोग झाला असल्याचा दावा जपानचे नेत्रतज्ज्ञ संशोधक डॉ. शीन यामने यांनी पुण्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेत केला.

राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेच्या (एनआयओ) वतीने आणि पुणे नेत्ररोग संघटना आणि महाराष्ट्र नेत्ररोग संघटनेच्या सहकार्याने डोळ्यांच्या आजारांसंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजजित करण्यात आली आहे. याप्रसंगी डॉ. शीन यामने बोलत नोत्या. परिषदेत डॉ. यामने यांना यंदाचा डॉ. चिराग भट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते व डॉ. रागिणी पारेख यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी डॉ. डॅनिअल ब्लॅक यांनी मल्टीफोकल इंट्राऑक्‍युलर लेन्सचे फायदे तोटे, डॉ. यान हार्वे यांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियासाठी असलेल्या अद्ययावत फेम्टोलेसर कॅटरॅक्‍ट सर्जरी तर डॉ. यान येऊ यांनी डोळ्यांच्या नेत्रपटलाच्या विकाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच आयोजक डॉ. श्रीकांत केळकर आणि डॉ. आदित्य केळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लहान मुलांच्या डोळ्यांचे नेत्रतज्ज्ञ डॉ. परीक्षित गोगटे यांना “एम. जी. भिडे पुरस्कार तर दिल्लीच्या एम्सच्या नेत्रतज्ज्ञ नम्रता शर्मा यांना डॉ. ए. एम. गोखले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. जाई केळकर यांनी प्रास्तविक तर अरुणा केळकर यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.