रत्नागिरी : मुंबई-मुरूडमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडण्याचे काम सुरू झालं आहे. नार्वेकर यांच्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून भाजपनेते किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला. तसेच पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांचा असल्याचा इशारा दिला. यावरून शिवसेना नेत्याने किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं, सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांचीच पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यांचीही पाहणी करावी. ते माध्यमांशी बोलत होते.
मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेल्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहाणी करावी, असं आव्हानच नाईक यांनी सोमय्यांना दिलं आहे.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा आहे. उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार असल्याचं ट्विट सोमय्या यांनी केलं होतं.