पाच दिवसांचा आठवडा : पालिका करणार तपासणी
पुणे – महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे आता शनिवार, रविवार पालिका बंद राहणार असल्याने सोमवार ते शुक्रवारमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, सकाळी वेळेत न येणाऱ्या लेट लतिफ कर्मचाऱ्यांवर पहिल्या दिवसापासूनच कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ही कामाची वेळ सकाळी साडेनऊ असणार असून उर्वरित कर्मचाऱ्यांना पावनेदहा वाजताची वेळ आहे. दरम्यान, कर्मचारी वेळेवर येतात की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत.
अत्यावश्यक सेवा विभाग वगळता अन्य विभागांना पाच दिवसांचा कामकाज आठवडा जाहीर झाला आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी तसे आदेश दिले असून, येत्या 29 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्याविषयीच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यामुळे पाच दिवसांचा कामकाज आठवडा झाला असला तरी कामकाजाची वेळ वाढवली. या निर्णयानंतर सोमवारी पालिकेचा नवीन वेळेच्या कामकाजाचा पहिला दिवस आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर वेळेत येणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना लाभ होणार असला तरी, सर्वसामान्यांना मात्र फटका बसणार आहे. त्यातच आयुक्तांनी या पाच दिवसांच्या आठवड्याचे आदेश काढतानाच कार्यालयीन कामकाजाच्या बदलेल्या वेळेची सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंद घेऊन काटेकोरपणे पालन करावे, असे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. विलंबाने येणाऱ्या आणि कार्यालयीन वेळ संपण्याआधी कार्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल दरमहा सर्व खातेप्रमुखांनी सेवकवर्गाकडे सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
खातेप्रमुख आणि त्यांच्या कार्यालयामध्ये उशिराचे हजेरीपत्रक ठेवून त्याची जबाबदारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर सोपवावी. या नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. मात्र, त्यानंतरही या लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत.