आता राजस्थानात शेतकरी बनले आक्रमक; भाजप नेत्याला आला संतापाचा अनुभव

जयपूर -केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी पंजाब, हरियाणापाठोपाठ राजस्थानातही आक्रमक बनले आहेत. त्यांच्या संतापाचा अनुभव शुक्रवारी एका भाजप नेत्याला घ्यावा लागला.

कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये संबंधित घटना घडली. त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा निषेध करण्यासाठी भाजपने धरणे आंदोलन जाहीर केले. भाजपच्या त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला.

शेतकऱ्यांचा एक गट आंदोलनस्थळी पोहचला. त्यावेळी भाजप नेते आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलास मेघवाल यांना घेरले. त्यांचे कपडे फाडण्यात आले.

तसेच, त्यांना धक्काबुक्कीही झाली. मेघवाल यांना शेतकऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पोलीस आणि इतर नेत्यांना पुढे यावे लागले. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी आठ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्या राज्यांमधील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातून पंजाब आणि हरियाणात शेतकरी भाजप नेत्यांविरोधातही निदर्शने करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.