मंचर (प्रतिनिधी) – नागापूर (ता. आंबेगाव) येथील पवार मळ्यानजीक अज्ञात चोरट्यांनी बराखीतून अंदाजे दहा पिशव्या कांदा लंपास केला. यामुळे परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नागापूरच्या पश्चिमेला पवार-निकम मळा आहे. तेथे पाण्याच्या टाक्यांजवळ शेतकरी प्रकाश महादू पवार यांची कांदा बराखी आहे. बराखीत अंदाजे पन्नास ते साठ पिशव्या कांदे शिल्लक आहेत. बराखीच्या आसपास मनुष्य वस्ती नाही. याचा फायदा चोरट्यांनी उठवला आणि आज (दि. 1) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बराखीतून अंदाजे दहा पिशव्या कांदा चोरून नेला असून, या कांद्याची किंमत अंदाजे बारा ते पंधरा हजार रुपये आहे.
कांदा चोरीबाबत पोलीस पाटील संजय पोहकर यांना शेतकरी प्रकाश पवार यांनी माहिती दिली. परिसरात अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बराखीत कांदा शिल्लक आहे. घडलेल्या या प्रकारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.