सातारा- जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर मार्च 2022 मध्ये प्रशासकांची निवड होवून ३२ महिने उलटले तरी अद्याप निवडणुका कधी लागतील याची शाश्वती नव्हती. मात्र आता राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्याने या निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत. विधानसभा निवडणुकीतच झेडपी, पंचायत समितीच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे आता या निवडणुकांचे वेध इच्छुकांना लागले असून असे झाल्यास ३२ महिन्यांपासून असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.
पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल संपल्यान 12 मार्च 2022 रोजी पंचायत समित्यांवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकार्यांची तर दि. 21 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नियुक्ती सरकारने करण्यात आली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील अशी परिस्थिती होती. कालांतराने राज्यात मोठा राजकीय स्फोट होवून शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाल्याने वारंवार प्रशासकांची मुदत वाढवण्यात आली. राज्यात एकप्रकारे राजकीय अस्थिरतेसारखी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी गेल्या ३२ महिन्यांपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट आहे.
वास्तविक प्रशासकांच्या नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी निवडणुका होतील अशी अपेक्षा असल्याने विविध पक्षाच्या नेत्यांनी इच्छुकांची पडताळणी सुरु केली होती. गट, गणात इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यात अनेकांनी मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा झालीच नसल्याने इच्छुकांबरोबर नेतेमंडळींमधून नाराजीचा सूर होता. यादरम्यान सरकारने जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापतींची आरक्षण सोडत जाहीर केली. त्यामुळे निवडणुका जाहीर होतील अशी परिस्थिती असतानाही निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल दिसून येत आहे.
तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 64 वरुन 73 तर पंचायत समितीची सदस्य संख्या 128 वरुन 146 केली होती. त्यामुळे गट आणि गणात इच्छुकांची संख्या वाढली होती. गट आणि गणांची आरक्षण सोडतही झाली होती. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडतही काढण्यात आ ली होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर जुन्याच पध्दतीने गट आणि गणाची रचना राहील असे सरकार पक्षाने सांगितले होते. सध्या राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्याने गट आणि गण पूर्वीप्रमाणेच राहणार की गट आणि गणांची पुर्नरचना होणार गट आणि गणांची संख्या वाढणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.