इस्लामाबाद – श्रीलंकेमध्ये टेहळणी आणि सर्वेक्षणाचे जहाज पाठवल्यानंतर चीनने आता पाकिस्तानमध्ये आपले सैन्य पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी “बेल्ट ऍन्ड रोड’ उपक्रमांतर्गत पाकिस्तानमधील प्रकल्पांना सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली तेथे आपले सैन्य तैनात करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाण्याची तयारी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मार्गाने दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आहे. त्यासाठीच या दोन देशांमध्ये संरक्षणासाठीच्या उपाययोजनांमध्ये चीनकडून मोठी गुंतवणूक केली जाते आहे. पाकिस्तानमध्ये चीनकडून केल्या जात असलेल्या गुंतवणुकीचे प्रमाण 60 अब्ज डॉलरच्याही पुढे गेले आहे. पाकिस्तान चीनवर वित्तीय तसेच लष्करी मदतीवरही अवलंबून आहे.
पाकिस्तानमधील राजकीय असमतोल हा चीनच्या पथ्यावरच पडतो आहे. पाकिस्तानच्या सीमेवर काही लष्करी ठाणी उभारण्यासाठी चीनकडून पाकिस्तानवर दबाव टाकला जाऊ लागला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि चीनसह अन्य अनेक देशांवर अवलंबून असलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबानकडून या दोन्ही देशांच्या अपेक्षांनुसारच कृती केली जाण्याची शक्यता आहे.
“बेल्ट ऍन्ड रोड’ प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी पीपल्स रिपब्लिक आर्मीकडून पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानमध्ये तळ उभा करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाकिस्तानातील संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. चीनचे पाकिस्तानमधील राजदूत नोंग रोंग यांनी यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ, परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, आणि लष्ककरप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चाही केली आहे. पाकिस्तानात चिनी सैन्याला मोठा विरोध होण्याची शक्यता असल्याने याबाबत घाईघाईने निर्णय होऊ शकणार नाही. मात्र, तरी ही हालचाल भारतासाठी धोकादायक ठरू शकते.