औरंगाबाद – राज्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी दोन दिवसांपासून कोविन ऍपवर नोंदणीही सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः उपस्थित राहून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी, त्यांनी 12 वर्षांमधील मुलांसाठीही लसीकरण व्हावे, अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचे सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची ईच्छा होती. पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे दवाखान्यात लसीकरण करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण शाळेतील लसीकरणाबाबत लवकरच विचार करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
लॉकडाऊनसंदर्भात ते म्हणाले, राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत राज्यांना समान निकष असायला हवे. तसेच लॉकडाऊनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा, अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.