यहां, हम तुम शबाना, बचना ए हसीनों आणि भूमी अशा काहीशा मुद्दे आधारित किंवा काही पूर्णत: व्यावसायिक चित्रपटांत काम केल्यावर मिनीषा लांबा अचानक गायबच झाली.
नंतर तिचे लग्न झाल्याची बातमी आली व आता पाच वर्षांच्या नात्याची घटस्फोटात परिणिती झाल्याचीही बातमी आहे. तसेच आता मिनीषा कुतुबमिनार या वेब फिल्ममध्ये असल्याचीही बातमी असल्यामुळे तिची बरीच चर्चा सुरू आहे.
याबाबत मिनीषा म्हणते की, आमचा म्हणजे कलाकारांचा ब्रेकही कॉर्पोरेट वर्ल्डमधील ब्रेकसारखाच असतो. पण माझ्याबाबत म्हणाल तर मी तेव्हाही मला हवे ते चांगले चित्रपट केले. आता तर ओटीटीमुळे चित्रच बदलले आहे.
आज स्थिती अशी आहे की, तुम्ही पाच वर्षांच्या ब्रेकनंतर परत येत असाल तरीही तुम्हाला चांगली संधी आणि चांगल्या ऑफर आहेत. मी तेव्हाही मला हवे ते काम केले आणि आजही मी तसेच करते आहे. कुतुबमिनारबद्दल ती म्हणाली की, यात कॉमेडी आहे व प्रेक्षकांना आवडणारा सगळा मसालाही आहे.
आपल्या खासगी आयुष्याबद्दलही तिने यावेळी भाष्य केले. लग्न हा तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग जरूर असतो. मात्र, तेच तुमचे पूर्ण आयुष्य नसते. जेव्हा एखाद्या नात्यात तुमची घुसमट होत असेल तर त्यातून बाहेर पडलेलेच योग्य असते. पूर्वी घटस्फोट झाल्यावर तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नव्हते.
मात्र, आजही महिला सक्षम आणि आत्मनिर्भर झाली आहे. त्यामुळे तिला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने आणि सन्मानाने जगण्याचा नक्कीच अधिकार आहे. प्रत्येक वेळी महिलेनेच कुर्बानी द्यावी असे आता राहिलेले नाही.
परदेशात स्वत:वर प्रेम करण्याची संकल्पना अगदी घट्ट आहे. याचा अर्थ स्वार्थी होऊन जगणे नाही. मात्र, स्वत:वर प्रेम करणे महत्त्वाचेच असते, असेही ती म्हणते.