अबकी बार अतुलबाबा ‘आमदार’

सुरेश डुबल

हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती
कराड दक्षिणेत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी केला निर्धार

चंद्रकांतदादांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या

सभास्थळी अतुलबाबाच्या समर्थकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी भाषण करताना चंद्रकांतदादांनी त्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. फक्त घोषणा देऊन कोणी आमदार होत नाही, तर प्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फिरून घरघर पिंजून काढले पाहिजे. या येणाऱ्या तीन-चार महिन्यांत कार्यकर्त्यांनी घरचे जेवण न जेवता मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेत उतरून तेथे जेवण करावे, असे सांगत प्रचाराचा मंत्रही दिला.

कराड  – हजारो कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेला सभामंडप. अधून-मधून पावसाच्या सरीवर सरी आणि या चैतन्यपूर्ण वातावरणात अतुलबाबा आगे बढो हम तुम्हारे साथ है, अबकी बार अतुलबाबा आमदार च्या गगनभेदी घोषणा. निमित्त होतं जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्याचे. या भरगच्च कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अतुलबाबांना आमदार करण्याचा निर्धार केला.

लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या चार महिन्यांवर या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तत्पूर्वीच राज्यातील युती व आघाडीने आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. गुरुवारी कराड दक्षिणमध्ये या कार्यक्रमात विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक अतुलबाबांनी दाखवली. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचेसह मातब्बर उपस्थित होते. नेमकी हीच संधी साधून अतुलबाबांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. याची दखल देखील मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. अतुलबाबा भाषणासाठी उठताच घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अतुलबाबांविषयी जे वाटत होते ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावे हाच कार्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता.

यानंतर व्यासपीठावर राजकीय फैरी झाडण्यास अतुलबाबांनी सुरुवात केली. देशात व राज्यात भाजप वाढत आहे. या भाजपनेच कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री यांना घरी घालवले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आ. पृथ्वीराज चव्हाणांची बारी असून, मुख्यमंत्र्यांचा हात डोक्‍यावर असेल तर आ. पृथ्वीराज बाबांना धूळ चारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असे म्हणत येणाऱ्या निवडणुकीतील आपले इरादे स्पष्ट केले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंतकाका पाटील यांना व्यासपीठावर आणण्याची किमयाही अतुल बाबांनी करून दाखवली. याची देखील चर्चा सभास्थळी चांगलीच रंगली होती. येणाऱ्या काळात अशा बऱ्याच घडामोडी घडतील, ही तर सुरुवात आहे असेच अतुलबाबांनी यावेळी सांगितले.

अतुलबाबांच्या या आत्मविश्वास पूर्ण भाषणानंतर ना. चंद्रकांतदादांनीही त्यांना साथ देत कॉंग्रेसवर निशाणा साधला. बुडत्या जहाजात बसून ना. अतुल भोसलेंना हरवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराच त्यांनी देत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अतुलबाबांना आमदार करायचंच, असा संकल्प केला. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या. चंद्रकांतदादांची री ओढत मुख्यमंत्री यांनी अतुलबाबांनी एखाद्या आमदारपेक्षाही जास्त कामे आमदार नसताना केली आहेत. असे म्हणत आ. पृथ्वीराज चव्हाणांच्या कामांवर टीका केली. अतुलबाबांच्या कामावर खूश होत असा उमदा आमदार आमच्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे अवाहन जनसमुदायासमोर केले.

या कार्यक्रमात फक्त न फक्त आबकी बार अतुलबाबा आमदार असेच वातावरण निर्माण झाले होते. ही वातावरण निर्मिती करण्यात अतुलबाबांना सध्या तरी यश आले. काही करून कराड दक्षिण मध्ये यंदा परिवर्तन करायचे, आणि येथे भाजपचे कमळ फुलवायचे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. या भव्यदिव्य समारंभामुळे कराड दक्षिण मतदार संघ राजकीय दृष्ट्या ढवळून निघाला आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात लक्ष घातल्याने येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागणार हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)