राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलने उडवला गुरु-शिष्य जोडीच्या सहकार बचाव पॅनलचा धुव्वा
बारामती- माळेगाव सहकारी साखर कारखाना 2015मध्ये हाताचा गेल्याचे शल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या पाच वर्षांपासून बोचत होते. त्यामुळे कारखान्याची 2020ची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली होती. ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला शह देण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यांनी थेट मैदानात उडी घेत कारखाना कायक्षेत्रातच ठाण मांडले होते. सभासदांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कौल दिल्याने आता पुढील पाच वर्षे कारखान्यावर “दादा’गिरी चालणार आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीत 21 पैकी 17 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलने पटकावल्यने कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले आहे तर तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलल अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. सोमवारी (दि. 24) मतमोजणीला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार होती. मात्र साडेतीन तासांहून अधिकचा विलंब झाला. ही मतमोजणी मंगळवारी (दि. 25) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संपली. त्यामुळे तब्बल 30 तास मतमोजणी यंत्रणेसह पोलीस यंत्रणा कार्यरत होती.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणल्यानंतर मंगळवारी बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. जसजसा मतमोजणीचा कल राष्ट्रवादीच्या दिशेने झुकू लागला, तसा राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. अनेकांनी रात्र मतमोजणी केंद्राबाहेर रस्त्यावर जागून काढली. निकाल हाती येत होते तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. “एकच वादा अजितदादा’ या घोषणांनी बारामती दुमदुमून गेली होती. “राष्ट्रवादी पुन्हा’च्या गीतावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत नाचही केला तर अनेकांनी परस्परांवर गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. काही उत्साही कार्यकर्ते व उमेदवारही निकालानंतर थेट अजित पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते.
- गुरू-शिष्याच्या जोडीचे आव्हान काढले मोडीत
सहकारातील तज्ज्ञ समजल्या जाणाऱ्या व माळेगावची रेघ न रेघ माहिती असलेल्या चंद्रराव व रंजन तावरे या जोडगोळीकडून कारखान्याची सत्ता ताब्यात घेण्याचे अजित पवारांसमोर एक आव्हानच होते, मात्र अजित पवार यांनी सूत्रे आपल्या हातात घेत राष्ट्रवादीच्या सर्वांना कामाला लावत ही सत्ता खेचून आणली. दरम्यान, सुरवातीला चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अजित पवार यांनी मैदानात उतरुन आपल्या बाजूला खेचून आणली. अत्यंत आत्मविश्वासाने व प्रसंगी इशारा देत केलेली भाषणे व सभासदांना भाव देण्याचा दिलेला शब्द यामुळे हे यश मिळाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. - …अन् राष्ट्रावादीची एक जागा वाढली
सांगवी गटात सहकार बचाव पॅनलचे रंजीत खलाटे व नीलकंठेश्वर पॅनलचे अनिल तावरे यांच्यात अटीतटीची लढत झाली. सुरुवातीला सहकार बचावचे रंजीत खलाटे यांना नऊ मताने विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने सचिन सातव यांनी फेरमतमोजणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर सांगवी गटाची फेर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये अनिल तावरे यांचा 20 मतांनी विजय झाल्याने राष्ट्रवादीची एक जागा आणखी वाढली.