करोना विषाणूचा प्रादुर्भाव : विमानतळांवर आरोग्य कर्मचारी तैनात
पुणे – करोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने चीन आणि हॉंगकॉंगसोबत थायलंड आणि मलेशियाहून थेट भारतात येणाऱ्या विमानातील आंतरराष्ट्रीय प्रवासी देखील तपासण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने मुंबई विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीला राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 10 वैद्यकीय अधिकारी आणि 15 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
वुहान शहरातून येणाऱ्या प्रवाशाला किंवा मागील 2 आठवड्यांत वुहान प्रवासाचा इतिहास असणाऱ्या प्रवाशाला लक्षणे असोत किंवा नसोत, विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेण्यात येणार आहे. बाधित भागातून दि.15 जानेवारी रोजी किंवा त्या नंतर येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांसाठी करण्यात येणार आहे. पूर्वी हा पाठपुरावा 28 दिवसांकरता करण्याच्या सूचना होत्या. या काळात त्यांना काही लक्षणे आढळली तर त्यांना विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेण्यात येणार आहे.
दि. 2 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8 हजार 878 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 104 प्रवासी आले असून, दि.18 जानेवारीपासून त्यापैकी 21 जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी 18 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून, उरलेल्या 3 जणांचे प्रयोगशाळेचे निकाल उद्यापर्यंत प्राप्त होणार आहे. 21 भरती झालेल्या प्रवाशांपैकी 15 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात 1, नायडू रुग्णालयात 4, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 1 रुग्ण भरती आहे.