जीवघेणे जलप्रदूषण : “पवने’तील जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात
पिंपरी – पवना नदीपात्रात केजूदेवी बंधाऱ्याजवळ पुन्हा एकदा अनेक मृत मासे आढळले आहेत. तर, ताथवडे स्मशानभूमीजवळ नदीपात्रात एक कासव मृत झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास ही बाब समोर आली. पवनेत वाढलेल्या प्रदुषणाने जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात येत असल्याचे स्पष्ट चित्र त्यामुळे समोर येत आहे.
केजूदेवी बंधाऱ्याजवळ मासे मृत्यूमुखी पडण्याची घटना यापूर्वी मे महिन्यात झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर पुन्हा दुसरी घटना घडली आहे. नदीपात्रात रासायनिक सांडपाणी मिसळल्याने हा प्रकार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, “एमपीसीबी’च्या (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीपात्रात घरगुती सांडपाणी थेट मिसळल्याने हा प्रकार झाला आहे. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. 4) रात्री प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याबाबत पाहणी केली असताना ही घटना समोर आली.
फाउंडेशनचे अनिकेत प्रभू, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर, महेश येळवंडे, श्रीकांत धावारे, राहुल जाधव तसेच वाईल्ड फॉर नेचरचे शुभम पांडे, राजेश कांबळे आदी कार्यकर्त्यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास “एमपीसीबी’च्या अधिकारी सुषमा कुंभार, महापालिका पर्यावरण विभागाचे अधिकारी एच.ए.मुल्ला यांनी पाहणी केली. पवना नदीपात्रात वाल्हेकरवाडी नाला आणि ताथवडे बाजूने मिसळणाऱ्या दोन नाल्यांच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्याशिवाय, ताथवडे घाट स्मशानभूमी, केजुदेवी बंधारा येथील पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
अद्यापही प्रश्न कायम
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे महिन्यात पवना नदीपात्रात मृत मासे सापडल्यानंतर महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेने नदीपात्रालगतच्या सांडपाणी नलिकांची कामे केली. मात्र, अद्यापही थेरगाव परिसरात काही ठिकाणी प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे सांडपाण्यामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे.
केजूदेवी बंधाऱ्याजवळ मृत मासे वाहून आल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. त्याबाबत महापालिका आणि “एमपीसीबी’च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. सांडपाण्यात रसायन मिसळले गेल्याने हा प्रकार घडला असावा. त्या संदर्भात “एमपीसीबी’कडून कारवाई करण्यात येईल.
– संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण).
पवना नदीपात्रात मिसळणाऱ्या नाल्यांची पाहणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) अधिकाऱ्यांनी आज केली. नदीपात्रात थेट मिसळणाऱ्या घरगुती सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यापूर्वी मासे मृत पावण्याच्या घटनेत महापालिका प्रशासनाला “कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. आताही याबाबत महापालिका प्रशासनाला विचारणा करण्यात येणार आहे.
– किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी.