बारामती (प्रतिनिधी) – पुणे शहरा पाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बारामती शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे बारामती शहरात देखील सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने तसेच व्यवहार सुरू राहतील. शहराबरोबरच तालुक्याला देखील हाच नियम लागू असल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. रात्री सहा ते सकाळी ९ संचारबंदी करण्यात आली आहे.
कोरोनाची वाढती लोकसंख्या बारामती करांसाठी चिंतेची बाब ठरत आहे त्यामुळे बारामतीत देखील मिनी लॉकडाऊन चेनियम लागू करण्यात आले आहेत. शहरातील मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जिम हे पुढील सात दिवस बंद असतील. सर्व आठवडे बाजारही या काळात बंद असतील.
दरम्यान बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असेल, असेही दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या पुरवठादारांसह हॉटेल पार्सल सेवेच्या व्यक्तींनाही यातून सूट देण्यात आली आहे. कोविड लसीकरणासाठी जाणा-यांनाही सूट दिली जाईल.
सर्व कारखाने व आस्थापनांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचा-यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. दहावी बारावीच्या नियोजित परिक्षा वगळता सर्व शाळा व महाविद्यालयांचे कामकाज येत्या 30 एप्रिलपर्यंत बंद असेल.
शासकीय नियमावलीचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई पोलिस करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बारामतीकरांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे व करुणा ची साखळी तोडण्यास सहकार्य करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.