करोना तपासणीसाठी आणखी 5 केंद्र वाढणार : हॉटस्पॉट भागातच घेणार स्वॅब
वेळ : सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत
पुणे – शहरातील करोना संशयितांच्या चाचण्यांची संख्या आता दिवसाला एक हजारपर्यंत नेण्यात येणार आहे. यासाठी आणखी पाच ठिकाणी बुधवारपासून सुविधा सुरू केली जाणार आहे. सध्या शहरात सुमारे 7 ठिकाणी स्वॅब तपासणीची (घशातील द्रवाचे नमुने) सुविधा असून, येथे सरासरी 600 ते 700 जणांचे नमुने दररोज घेतले जात आहेत. मात्र, ही नवीन पाच केंद्र वाढल्याने चाचण्यांची संख्या वाढणार आहे.
अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही नवीन केंद्र हॉटस्पॉट भागातील असल्याने रुग्णांची संख्याही काही काळ वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
शहरात करोना रुग्ण वाढणे सुरू झाल्यानंतर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. सुरूवातीला केवळ नायडू हॉस्पिटलमध्ये ही सुविधा होती. त्यानंतर ती ससून रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय पालिकेच्या सात रुग्णालयांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती. मात्र, आता केवळ ठराविक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतच रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी, पालिकेने आणखी 5 ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी केंद्र सुरू केली जाणार आहेत. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी दैनंदिन तपासण्या, क्वारंटाइन तसेच उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ज्या भागात रुग्णांची तसेच संशयितांची संख्या जास्त आहे, त्याच भागात करोना तपासणीसाठीचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.
तसेच ज्यांचे नमुने घेतले जातील, त्या सर्वांना अहवाल येईपर्यंत त्याच भागात विलगीकरण केले जाणार आहे. यामुळे तपासणीची संख्या वाढणार असून, नागरिकांना आपल्याच भागात विलग केल्याने त्याला प्रतिसाद मिळून साथीला अटकाव शक्य होणार आहे. शिवाय प्रशासनाचा वेळही वाचेल, असे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
या ठिकाणी सुविधा
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय – क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग शाळा, येरवडा
ढोले पाटील रस्ता – महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, ताडिवाला रस्ता
शिवाजीनगर – घोले रस्ता – भारत इंग्लिश स्कूल, सिमला ऑफिसजवळ
भवानी पेठ – सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय
कसबा-विश्रामबाग वाडा परिसर – ज्ञानदा मंगल कार्यालय (शास्त्री रस्ता)