रोम – अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेत लाइनवुमनला चेंडू मारल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागलेला सर्बियाचा जागतिक अव्वल क्रमांक असलेला टेनिसपटू नोवाक जोकोविच याने इटालियन टेनिस स्पर्धेतही गैरवर्तन केले. या स्पर्धेतील सामन्यात त्याने एका सेटमध्ये निर्णायक गुण मिळवता न आल्याने रागाच्या भरात आपली टेनिस रॅकेट आपटून तोडून टाकली.
स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने जर्मनीच्या डॉमिनिक कोफर याचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, या लढतीतीत दुसरा सेट सुरू असताना 3-3 अशा बरोबरीनंतर सर्व्हिस गमावल्याने तो निराश झाला व रागाच्या भरातच त्याने आपली रॅकेट तोडली. अर्थात त्याला रेफ्रींनी समज दिल्यावर त्याने दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यावर कारवाई होणार का हे आयोजक समिती ठरवणार आहे.