कुख्यात अफसर कांबळे गॅंगचा सदस्य पिस्तूलासह जेरबंद

 पुणे – कुख्यात अफसर कांबळे गॅंगचा सदस्य निखील जगदाळेला(32,रा.आंबेगाव पठार) पिस्तूलासह जेरबंद करण्यात आले. दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. बालाजीनगर परिसरातील बैजू नवघणे खून प्रकरणानंतर परिसरातील स्थानिक गुन्हेगारांमध्ये खूनाचे सत्र सुरु झाले होते. यामध्ये काही कालावधीतच पाच जणांचे खून झाले होते. 

अफसर कांबळे व निखील कांबळे यांनी टोळीतील सदस्यांसह धनकवडी येथील एका दुकानात काम करणाऱ्या दोघांना जाळून मारले होते. कापसाचे पेटते गोळे दुकानात टाकून दुकानाचे शटर बंद करण्यात आले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शरद राऊत व शिवाजी क्षिरसागर यांना जगदाळे हा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन पर्वतीदर्शन पुलाखाली थांबला असल्याची खबर मिळाली.

त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे सापडली. याची किंमत 30 हजार 400 रुपये इतकी आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुधीर घोटकुले करत आहेत. 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार,पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, पोलीस अंमलदार महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले,शरद राऊत, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले यांच्या पथकाने केली.

निखील जगदाळे हा 2012 साली धनकवडी येथील कुख्यात गुंड अफसर कांबळे व त्याच्या साथीदारांनी जळीत कांड करुन दोन व्यक्तीचा खुन केलेल्या गुन्हयातील आरोपी आहे. त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याने पिस्तूल जवळ बाळगण्याचा उद्देश नेमका काय होता, याची चौकशी पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.