सातारा -पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड शीतल उर्फ नितीन भीमराव खरात यालावर “एमपीडीए’ कायद्यानुसार स्थानबद्द करण्यात आले आहे. खरात याच्यावर पुसेगाव पोलीस ठाणे व पुणे जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर “एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्याचा पुसेगाव पोलिसांनी पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, पुसेगाव पोलीस ठाणे व पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान, खंडणी मागणे यासारखे गंभीर गुन्हे नितीन खरात याच्यावर दाखल होते. गुन्हे दाखल झाल्यावर प्रत्येक वेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर वर्तणुकीत सुधारणा होण्याऐवजी खरातची गुन्ह्यांची मालिका सुरुच होती. ही मालिका थांबत नसल्याने कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे,पुसेगावचे सपोनि विश्वजित घोडके यांनी कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी त्याची छाननी करून हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी सिंह यांनी पोलीस दप्तराची पडताळणी केली.
त्यात खरात हा धोकादायक गुन्हेगार असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश सिंह यांनी दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, विश्वजित घोडके, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सहाय्यक फौजदार आनंदराव जगताप, हवालदार प्रवीण शिंदे, विजय खाडे, सचिन माने, इम्तियाज मुल्ला, सुनील अब्दागिरे, सचिन जगताप, विलास घोरपडे यांनी ही कारवाई केली.