कुख्यात गुंड दीपक मसुगडे हद्दपार

पुसेगाव  – पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेला कुख्यात गुंड दीपक नामदेव मसुगडे (वय 23) याच्यावर एका वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुख्यात गुंड दीपक मसुगडे (रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याच्यावर फलटण ग्रामीण, दहिवडी व पुसेगाव पोलीस ठाण्यांमध्ये चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या, खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत.

पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. तो तुरुंगात होता. मसुगडेच्या विरोधात पुसेगाव पोलिसांनी तडीपरीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये मसुगडेला दोषी ठरवून पोलीस अधीक्षकांनी चार तालुक्‍यांमधून त्याच्या तडीपारीचे आदेश दिले होते.

तो तीन वर्षांनंतर जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर येताच पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत मसुगडेला एक वर्षासाठी तडीपार केले आहे. या कारवाईमुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे कारवाई सुरू असल्याचे घोडके यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.