सोनई – घोडेगाव मेन पेठेत ज्वेलर्सचे दुकान फोडून अन्य ठिकाणी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना सोनई पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. या कारवाईत अहमदनगरसह, बीड, लातूर, अंबाजोगई, माजलगाव, जालना औरंगाबाद, नांदेड, अमरावती याठिकाणी गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांची नोंद असलेला कुख्यात गुन्हेगार सय्यद सिकंदर अख्तर तसेच सराईत गुन्हेगार शंकर तान्हाजी जाधव यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई नगर-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी (दि.25) पहाटे सोनई पोलिसांनी केली.
अख्तर व जाधव यांच्यासह राहुल साहेबराव वैरागर, बाळू दशरथ गायकवाड, संदीप शंकर पवार (तिघेही रा. घोडेगाव ता. नेवासा) यांनाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून जबरी चोरी, दरोडा व घरफोडीचे साहित्य त्यात लोखंडी कटावनी, लोखंडी सुरा, लोखंडी रॉड, मिरचीपूड, बॅटरी आदी जप्त करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी रात्री दोन वाजता चोरट्यांनी घोडेगाव मेन पेठेत महावीर ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चोरी केली, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
नगर-औरंगाबाद हायवे रोडवर चर्चलगत झाडाखाली शस्त्रांसह संशयितरित्या थांबलेले पाच ते सहा इसम आढळून आले. पोलिसांना पाहताच दरोडेखोर मोटारसायकलीवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत पाच आरोपींना जेरबंद केले. तर एकजण पसार झाला. आरोपी सय्यद अख्तर याच्यावर विविध स्वरूपातील तब्बल 66 गुन्हे दाखल आहेत. तर शंकर जाधव याच्यावर गंभीर स्वरुपाचे 52 गुन्हे दाखल आहेत.