पिंपरी – तरुणीसोबत जमलेले लग्न मोडल्यानंतर तरुणीची बदनामी करणारे मॅसेज तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठविण्यात आले. याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 डिसेंबर 2017 ते 9 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला आहे.
बॉनी पिल्ले (रा. कथे कॉलनी, देवळाली कॅम्प, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बॉनी आणि फिर्यादी तरुणी यांचे सुरुवातीला लग्न जमले होते परंतु काही कारणास्तव मोडले.
त्यानंतर तरुणीची इच्छा नसताना देखील बॉनी याने तिचा पाठलाग केला. तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिला असता बॉनीने तरुणीला आणि तिच्या घरच्यांना शिवीगाळ करून धमकी दिली.
दरम्यान तरुणीचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत जमले. बॉनी याने तरुणीच्या होणाऱ्या पतीला इंस्टाग्रामवर तरुणीबद्दल बदनामीकारक मेसेज पाठवले.