नवी दिल्ली : माजी खासदार बनलेल्या 200 हून अधिक जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना दिल्लीतील सरकारी बंगले सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. नियमांनुसार मागील लोकसभा विसर्जित झाल्यानंतर महिनाभरात माजी खासदारांनी सरकारी बंगले खाली करणे अपेक्षित आहे. मात्र, त्या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ सरकारी बंगले ताब्यात ठेवणाऱ्या माजी खासदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
तशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आलेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश नसल्याचे समजते. आतापर्यंत ४ माजी केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगले सोडले आहेत. त्यामध्ये स्मृती इराणी यांचाही समावेश आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मागील वेळी उत्तरप्रदेशच्या अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पराभूत करण्याची किमया स्मृती यांनी करून दाखवली. मात्र, त्यांना यावेळी गांधी परिवाराचे निकटवर्तीय किशोरीलाल शर्मा यांनी पराभूत केले.