पुणे – करोना चाचणी अहवालाची माहीती महापालिकेकडे वेळेत न पाठवणाऱ्या तीन लॅबला नोटीस पाठवण्यात आली आहे. संबंधित माहिती वेळेत न मिळू शकल्याने करोनाविषयक उपाय योजना करण्यात अडचणी येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
‘आयुजेन बायोसायन्सेस प्रा. लि’, ‘क्रष्ना डायग्नोस्टिक प्रा. लि’, ‘ए. जी. डायग्नोस्टिक प्रा. लि’ ही लॅबची नावे आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, तो नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका उपाययोजना करत आहे. त्यासाठी चाचणीच्या अहवालाची माहिती राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांना तत्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने करोना चाचणी करण्यात येणाऱ्या लॅबकडून माहिती मिळणे आवश्यक असताना, त्यांच्याकडून उशीर होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.
संबंधित तीन लॅबकडून माहिती मागवली जात होती. या तीनही लॅबकडून दैंनदिन चाचणीच्या अहवालाची माहिती उशिरा दिली जात होती. यामुळे उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत आहे.
यामुळे या तीनही लॅबला अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार लॅब बंद करणे किंवा, तिची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.