सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला नोटीस

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण आणि मोजणी झालेल्या मतांची संख्या यांच्यात तफावत असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरून न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि कॉमन कॉज या दोन स्वयंसेवी संस्थांनी (एनजीओ) तफावतीचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. एडीआरने आपल्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देत मतदानाचे प्रमाण आणि मोजणी झालेल्या मतांच्या संख्येत फरक असल्याचा दावा केला आहे.

तब्बल 347 लोकसभा मतदारसंघांमध्ये तफावत आढळून आल्याचे एडीआरने याचिकेत म्हटले आहे. ती तफावत केवळ 1 मतापासून ते 1 लाख 3 हजार 23 मतांपर्यंत आहे. विजयी उमेदवारांच्या मताधिक्‍यापेक्षाही तफावत अधिक असल्याचे 6 मतदारसंघांमध्ये आढळले, असा दावा करतानाच निकाल अचूक असावेत, अशी अपेक्षा याचिकेतून करण्यात आली आहे.

आता दोन्ही एनजीओंनी दाखल केलेल्या याचिकांवर फेब्रुवारी 2020 मध्ये सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.