धोकादायक 350 मिळकतींना नोटीस

40 धोकादायक वाड्यांवर कारवाई

पुणे -दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर येतो. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने महिनाभरात 40 धोकादायक वाड्यांवर कारवाई केली आहे; तर 350 धोकादायक मिळकतींना नोटीस दिल्या आहेत.

जुन्या पुण्यामधील पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या वाड्यांची संख्या आहे. हे वाडे शंभर वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेले आहेत. त्यामुळे यातील अनेक वाडे जीर्ण झाले आहेत. तरीही त्याठिकाणी अनेक कुटुंब आजही वास्तव्य करतात.

पावसाळ्यामध्ये जुने वाडे पडण्याचे प्रकार दरवर्षी होतात. तेथे राहणाऱ्या कुटुंबांच्या जीविताला धोका असल्याने महापालिकेकडून त्यांना वारंवार नोटीस देण्यात येतात. पावसाळ्याच्या तोंडावर वाडा उतरवण्याची कारवाईही केली जाते. सद्यस्थितीत 350 जुन्या धोकादायक मिळकतींना नोटीस दिल्या आहेत. त्यापैकी 40 वाड्यांवर कारवाईही केली आहे. दरम्यान, शहरातील अनेक वाड्यांमध्ये भाडेकरू राहात असल्यामुळे घरांवरचा हक्‍क जाईल या भीतीने वाडे सोडले जात नाहीत. भाडेकरूकडून मिळणारे दरमहा भाडे महिना दोन आणि तीन रुपये असल्याने वाडे मालकांना वाड्यांची देखभाल दुरुस्ती करणे परवडत नाही. अनेक ठिकाणी मालक आणि भाडेकरू असे वादही आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.