नोटीस प्रेमदान रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश

15 दिवसांत अतिक्रमण काढून घेण्याची बजावली 

नगर – सावेडी येथील प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेस लेआऊट प्लॅनप्रमाणे मंजूर असलेल्या दक्षिण-उत्तर रस्त्यावर बेकायदेशीर व्यावसायिक गाळ्यांचे अतिक्रमण करुन सदर रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. ऍड.कारभारी गवळी यांच्या तक्रारीवरुन सदरचे बांधकाम बेकायदेशीर ठरवीत 15 दिवसात काढून घेण्याचे आदेश महापालिकेने नुकतेच दिले आहे.

सावेडी सर्व्हे नं. 109 मध्ये वसंत गायकवाड या जमीन मालकाने सन 1992 साली ले आऊट प्लॅन टाकून शेकडो प्लॉट्‌सला नगरपालिकेकडून मंजुरी मिळवली होती. 1992 च्या ले आऊट प्लॅन प्रमाणे मंजूर असलेला 174 मीटर लांबीचा व 8 मीटर रुंदीचा प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेस शेजारी दक्षिण-उत्तर असलेला रस्ता सार्वजनिक रस्ता म्हणून नागरिक उपयोग करीत होते. मात्र गेल्या काही वर्षामध्ये किरण गायकवाड याने या सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम करुन व्यावसायिक गाळे काढले. यामुळे पलीकडील भागातील नागरिकांना रहदारीचा रस्ता बंद झाल्याची तक्रार ऍड.गवळी यांनी केली होती.

या जागेची समक्ष पहाणी केली असता महापालिकेची परवानगी न घेता प्रेमदान हडकोच्या संरक्षक भिंतीपासून मंजुर रेखांकनातील 8 मी. रुंद रस्त्यासह इतर जागेत साडे दहा मीटर लांब व साडे दहा मीटर रुंद या क्षेत्रफळाचे लांबीचे बांधकाम केले असल्याचे नगररचनाकार यांनी अभिप्राय दिला. सदरचे बांधकाम अनाधिकृत असल्याचे सिध्द करीत, सदरील बांधकाम नियमीत करुन घेण्यास अथवा हटविण्यास पुरेशी संधी देण्यात आली होती. परंतू विनापरवाना बांधकाम न थांबविता ते पुर्ण करुन त्याचा व्यावसायिक वापर सुरु केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर याप्रकरणी सुनावणी होऊन बांधकाम परवानगी घेतल्याचे किंवा अनाधिकृत बांधकाम पाडल्याचे कोणतेही कागदपत्र गायकवाड यांना सादर करता आले नाही. पुनश्‍च मुदत न देता सदर अनाधिकृत बांधकाम 15 दिवसाच्या आत काढून घेण्याचे आदेश महापालिकेने उपायुक्तांच्या स्वाक्षरीने दि.1 एप्रिल रोजी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.