Dadar Hanuman Mandir | दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर ८० वर्षे जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने हटवण्याची नोटीस बजावली आहे. रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस ४ डिसेंबर रोजी जारी करण्यात आली. त्यावरून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
‘एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला पत्र देखील पाठवलं आहे. तसेच त्यांना रेल्वे प्राधिकरणाने आश्वासन दिले आहे की ते पाडण्याच्या नोटिसीचे पुनरावलोकन करतील. मला आशा आहे की ते मागे घेतले जाईल. अनेक दशके जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले. Dadar Hanuman Mandir |
80 वर्षे जुनं मंदिर
दादरमधील हे मंदिर तब्बल 80 वर्षे जुनं असून स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनी बांधले आहे. विशेष म्हणजे या मंदिराची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून 1969मध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीही झाली. तरीही रेल्वेने 7 दिवसांचा अल्टिमेटम मंदिराच्या विश्वस्थांना दिला. अर्थात मंदिर तुटू देणार नाही, असं भाजपनं म्हटले आहे.
रेल्वे प्रशासनाने नोटीसमध्ये काय म्हंटले?
सदर हनुमान मंदिर रेल्वेच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या मंदिरामुळे प्रवासी आणि वाहनांना ये-जा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच दादर स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामातही त्यामुळे व्यत्यय येत आहे. दादर स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम भारतीय रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत केले जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मंदिर हटवण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. विहित कालावधीत मंदिर न हटवल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत कार्यवाही केली जाईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. Dadar Hanuman Mandir |