अहमदाबाद – गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी पक्षाचा व्हीप डावलून राज्यसभा निवडणुकीत मतदान केल्याने त्यांना पक्षाने “कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. गेल्या 19 जून रोजी झालेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना कॉंग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता. पण त्यांनी तो डावलून भाजप उमेदवाराला मतदान केल्याचे निदर्शनाला आल्याने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले असून त्यांनी तो खुलासा केला नाही तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जडेजा यांनी आपण भाजप उमेदवारांना मतदान करणार आहोत, अशी जाहीर भूमिका मांडली होती. या आधीही त्यांनी सन 2017 च्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही पक्षाचा व्हीप डावलून कॉंग्रेसऐवजी भाजपला मतदान केले होते. गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत चारपैकी तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर कॉंग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीत कॉंग्रेसचेही आठ आमदार फुटले त्यामुळे कॉंग्रेसचे गणित बिघडले अन्यथा कॉंग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणणे सहज शक्य होते.