नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बुधवारी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. धर्माच्या आधारे मतं मागितल्याबद्दल ममतांकडून उत्तर मागवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना 48 तासांची मुदत देण्यात आली आहे.
मुस्लिम मतदारांनी त्यांच्या मतांची विभागणी विविध राजकीय पक्षांमध्ये होऊ न देता तृणमूल कॉंग्रेसच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन ममतांनी काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेत केले. त्यावरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने ममतांना नोटीस बजावली. ममतांचे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या राज्यात आठ टप्प्यांत मतदान होणार आहे.