मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मनी लॉंड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने ईडीला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे.
ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुखांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसर आरोपपत्र आहे.
या आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांची दोन्ही मुले ऋषिकेश आणि सलिल यांच्या नावाचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.
विशेष न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही. तसेच देशमुख हे 60 दिवसांपासून कोठडीत आहेत. त्यामुळे देशमुखांना डिफॉल्ट जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी देशमुखांनी अर्जातून केली होती. मात्र, तो अर्ज न्यायालयाने 17 जानेवारी रोजी फेटाळून लावला.
त्यानंतर आता देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत बाजू मांडण्याचे निर्देश देत 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.