लखनौ – उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यातील दुर्रजानपूर गावात 15 ऑक्टोबर रोजी पोलिसांसमक्षच भाजपच्या एका समर्थकाने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली होती. धिरेंद्र प्रतापसिंह असे या हल्लेखोराचे नाव आहे.
भाजपचे तेथील आमदार सुरेंद्रसिंह यांनी धिरेंद्र प्रतापसिंह यांच्या कृत्याचे जाहीर समर्थन केल्याने प्रदेश भाजपने त्या आमदाराला नोटीस जारी केली आहे. एका आठवड्याच्या आत त्यांना या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य टाळावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
हल्लेखोर धिरेंद्र हा भाजप आमदार सुरेंद्रसिंह यांचाच समर्थक मानला जात आहे. त्याला अटक करण्यात आली असली तरी त्यावरूनही भाजप आमदाराने आगपाखड केली होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून त्यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून फोनवरून माहिती घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.