“त्या’ बांधकाम व्यावसायिकांना बजाविणार नोटीस – आयुक्‍त हर्डीकर

  • शहरातील सोसायटीधारकांच्या कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी

जाधववाडी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतांश गृहप्रकल्पांमध्ये कचरा समस्येचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीत ज्या बांधकाम व्यावसायिकांनी सोसायट्यांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले नाहीत त्यांना पाच दिवसांत नोटीस बजाविण्यात येईल, असे निर्देश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

या बैठकीसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे व इतर सभासद उपस्थित होते. शहरातील बहुतांश सोसायट्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला नाही. तसेच त्यासाठी आवश्‍यक यंत्रसामग्री देखील खरेदी केली नाही. असे असताना महापालिकेने “त्या’ बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे सोसायटीधारकांना ओला कचऱ्याचे व्यवस्थापन करणे शक्‍य होत नाही. तेव्हा अशा बांधकाम व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोसायटी फेडरेशनने केली होती.

महापालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना कचरा प्रकल्प सोसायट्यांमध्ये सुरू करण्याचे आदेश द्यावेत. तसेच त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आवश्‍यक साधने पुरवावीत. जोपर्यंत प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत सोसायटींमधील ओला कचरा उचलणे महापालिकेने बंद करू नये.
– महेश लांडगे, आमदार

पाच दिवसांत संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजाविण्यात येईल. ज्यांनी गृहप्रकल्पांमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले नाहीत त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. तसेच, बांधकाम विभागातील ज्या अधिकाऱ्यांनी बिल्डरला पाठीशी घातले. नियमांचे उल्लंघन करून बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले त्यांची चौकशी करून दोषींवर 8 दिवसांत कारवाई करण्यात येईल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त महापालिका

Leave A Reply

Your email address will not be published.