महापालिकेकडून ऑडिटचे काम पुन्हा सुरू; मार्चपासूनची बिल तपासणार
पुणे – पुन्हा एकदा खासगी रुग्णालयातील करोना बाधितांच्या उपचाराच्या बिलाचे ऑडिटचे काम महापालिकेत सुरू झाले असून, 172 रुग्णालयांना वाढीव बिलप्रकरणी नोटीसा देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने कोविड रुग्णांच्या बिलांचे दर नियंत्रित केले असतानाही अनेक खासगी रुग्णालयांनी वाढीव बिले लावली. दोन लाख रुपयांपासून ते नऊ-दहा लाख रुपयांपर्यंत अनेकांची बिले झाली. रुग्णालयांच्या या मनमानीला चाप बसवण्यासाठी राज्यसरकारने दरही ठरवले. परंतु, अन्यसेवांच्या आड अनेक प्रकारची बिले घेतली जात होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने बिलांचे ऑडिट सुरू केले.
गेल्या वर्षापासून कोट्यवधी रुपयांची बिले कमी करून दिली आहेत. मार्च पासून पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढली आणि तोच वाढीव बिलांचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेकडे तक्रारी आणि रोज सुमारे 25 अर्ज ऑडिटसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे मार्च पासून आकारलेल्या बिलांचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे, महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपासून आतापर्यंत वाढीव बिल आकारल्याप्रकरणी 222 रुग्णालयांच्या तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत 172 खासगी रुग्णालयांना नोटीसा दिल्या असून, त्यापैकी 90 निकाली काढल्या आहेत. 27 बिलांचे लेखापरीक्षण करून त्यांचे 20 लाख रुपये परत दिले आहेत. तर 15 जणांचा संपर्क होत नाही तसेच काहींमध्ये तथ्य आढळले नाही, अशी माहिती डॉ. नाईक यांनी दिली.
आता शहरातील प्रत्येक कोविड बिलांची पूर्व आणि पश्चात लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यांनी ऍनेक्शर “सी’ प्रमाणे बिल आकारले की नाही हे पाहण्यात येते.
– डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
सह्याद्री रुग्णालयाने परत केले 22 लाख
शहरातील सह्याद्री रुग्णालयाच्या सर्व शाखांतून 34 रुग्णांचे जास्त आकारलेले बिल परत देण्याचे आदेश पालिकेने देऊनही त्यांना दाद दिली नव्हती. त्यामुळे, पालिकेने रुग्णालयांचा नर्सिंग होमचा परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवताच रुग्णालय प्रशासन नरमले आणि त्यांनी सर्व रुग्णांचे अतिरिक्त घेतलेले 22 लाख परत केल्याचे लेखी स्वरूपात महापालिकेला दिले आहे. रुग्णालयाचे डॉ. धनंजय चांदककर यांनी ही माहिती महापालिकेला लेखी पत्राद्वारे दिली आहे.
वाढीव बिलाची तक्रार येथे करा…
कोविडच्या साधारण बेडसाठी प्रतिदिन 4 हजार, ऑक्सिजन बेडसाठी साडेसात हजार आणि व्हेंटीलेटर बेडसाठी 9 हजार अशी बिल आकारण्याची मर्यादा राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना ठरवून दिलेली आहे. यापेक्षा दरदिवशी जास्त बिल आकारल्यास रुग्णांनी पालिकेच्या 020- 25502115 या क्रमांकावरही तक्रार करावी. याशिवाय शहरातील 30 मोठया रुग्णालयांत बिलांचे जागेवरच लेखापरिक्षण करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
लेक्षापरीक्षण तपशिल द्या ः जिल्हाधिकारी
करोना रुग्णांकडून जादा बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचे लेक्षापरिक्षण करण्यात येत आहे. या लेखापरीक्षणात आत्तापर्यंत वसूल केलेली रक्कम किती रुग्णांना परत केली आणि किती रुग्णांना परत केली नाही, याचा सर्व तपशिल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढील सात दिवसांत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांचे पथक तयार करून त्यांना लेखापरीक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येत आहेत. लेखापरीक्षकांनी रुग्णालयाकडून सर्व देयके रुग्ण डिस्चार्ज होण्यापूर्वी प्राप्त करून लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे.