पुणे : शहरातील 323 रस्तांचे नऊ मीटर पर्यंत रूंदीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. तसेच अद्याप हा रूंदीकरणाचा निर्णय झालेला नसतानाच महंमदवाडी स.नं 59 भागात महापालिकेच्या पथविभागाकडून नागरिकांना रूंदीकरणाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे ज्या घरांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक घरे गुंठेवारीत मंजूर असून कमी जागेत आहेत. तर अनेक घरांना अस्तित्वातील रस्त्यांच्या रूंदीनुसार, पालिकेनेच मान्यता दिलेली असे असतानाही, काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी या नोटीसा बजाविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केला असून या रूंदीकरणास विरोध केला आहे.
सत्ताधारी भाजपकडून चूकीच्या पध्दतीने रस्ते रूंदीकरणाचे धोरण केले जात आहे. अशा प्रकारे ठराविक घटकांच्या हितासाठी सर्वसामान्यांच्या घरावर हातोडा फिरविला जाणार असल्यास त्याला विरोध केला जाईल तसेच तीव्र आंदोलन केले जाईल.
– नाना भानगिरे ( स्थानिक नगरसेवक)
महंमदवाडी स.नं 59 येथे आनंद नगर, कृष्णा नगर व इतर 3 ठिकाणी 3 मीटरचा रस्ता आहे. या ठिकाणी गुंठेवारीतील तसेच अधिकृत बांधकामे आहेत. त्यानंतर पुढे एका बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू आहे. त्या व्यासायिकाच्या साईटकडे जाण्यासाठी रस्ता छोटा पडत आहे. त्यामुळे, बांधकाम व्यावसायिकाच्या सोयीसाठी पालिकेने या ठिकाणच्या सहा घरांना रूंदीकरणाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या असल्याचे भानगिरे यांनी सांगितले.
दरम्यान, ही बाब चूकीची असून रस्ता रूंदीकरणाची मागणी नसताना तसेच रस्त्यांच्या रूंदीकरणाचा धोरणात्मक निर्णय झालेला नसताना नोटीसा बजाविणे बेकायदेशीर असून या नोटीसा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.