पद्मश्री पुरस्कारप्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पिंपरी-चिंचवड पालिकेची नोटीस

सात दिवसांत कर न भरल्यास मालमत्ता होणार सील

पिंपरी – नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरूकुलुम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस बजाविली आहे. केंद्रातील भाजपाच्या सरकारने प्रभुणे यांची दखल घेतली गेलेली असतानाच भाजपाचीच सत्ता असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने काढलेल्या नोटीशीबद्दल आश्‍चर्य व्यक्त आहेत. प्रभुणे यांच्यासह 25 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 325 मालमत्ताधारकांनाही महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांच्या आत थकबाकी भरावी अन्यथा मालमत्ता सील करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सद्यस्थितीत 5 लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी 4 लाख 47 हजार, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक 3 हजार 700, मोकळ्या जागा 8 हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर 5 हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिका कर आकारणी करते. मात्र अनेक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे महापालिकेने जप्तीच्या नोटीसा बजाविल्या आहेत. मात्र, या करधारकांसोबतच प्रभुणे यांचे उल्लेखनिय कार्य चालविणाऱ्या पुनरुत्थान समरसता संस्थेला काढलेल्या नोटीशीमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

शहरातील करबुडव्यांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 16 विभागीय कर संकलन कार्यालयामार्फत थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 25 लाख रुपयांचे पुढे थकबाकी असलेल्या 325 मालमत्ता धारकांचा यामध्ये समावेश आहे.

या सर्वांना नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांमध्ये थकबाकी भरण्यात यावी अन्यथा मालमत्ता सील करण्यात येणार असल्याचे नोटीसीमध्ये म्हटले आहे. यामध्ये नुकत्याच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेचाही समावेश आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरूकुलम या संस्थेला याबाबत नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडे 2 कोटी 98 लाख 66 हजार 482 रुपयांची थकबाकी आहे.

तीन कोटींची थकबाकी
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे क्रांतिवीर चापेकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची गांधीपेठ चिंचवड येथे इमारत आहे. ही बिगरनिवासी मालमत्ता 4952 चौरस फूटांची आहे. त्याचे 1 कोटी 21 लाख 7 हजार 340 रुपये थकले आहेत. तर दुसरी बिगरनिवासी अनधिकृत मालमत्ता पांढरीचा मळा, क्रांतिवीर चापेकर विद्यालयासमोर गांधीपेठ चिंचवड येथे आहे. ती मालमत्ता 53,766 चौरस फूट असून त्याचे 1 कोटी 77 लाख 59 हजार 142 रुपये थकलेले आहेत. असे एकूण 2 कोटी 98 लाख 66 हजार 482 रुपये क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने महापालिकेचे थकवलेले आहे.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेच्या शाळा व आश्रमावरील ही थकबाकी आहे. त्यापैकी आश्रमावर अवैध बांधकाम शास्तीकर लागू आहे. दोन्ही मिळकतींवर मिळून 2 कोटी 98 लाखांची थकबाकी आहे.
– स्मिता झगडे-मारणे, उपायुक्त, करसंकलन विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.