नवी दिल्ली : प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या परिवारातील सदस्यांना ब्लॅक मनी ऍक्ट 2015 मधील तरतुदींनुसार आयकर विभागाच्या मुंबई विभागाने नोटीस पाठवली आहे. निरनिराळ्या देशातील संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आलेल्या तपासानंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 28 मार्च 2019 रोजी आयकर विभागाने मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांच्या तीन मुलांच्या नावे ही नोटीस पाठवली आहे.
2011 मध्ये एचएसबीसी जिनिव्हामध्ये अंदाजे 700 भारतीय व्यक्ती आणि सस्थांची खाती असल्याची माहिती सरकारला मिळाल्यानंतर आयकर विभागाने चौकशीला सुरूवात केली होती. यानंतर 2015 मध्ये स्विस लिक्स या तपासादरम्यान एचएसबीसी बॅंकेतील खातेधारकांची संख्या वाढून ती 1 हजार 1195 झाल्याची माहिती समोर आली होती. एका इंग्रजी वर्तमानपत्राने केलेल्या तपासात टॅक्स हेवन समजल्या जाणाऱ्या देशात खुल्या ऑफशोर कंपन्याचे एचएसबीसी जिनेव्हा बॅंकेतील 14 खात्यांशी संबंध असल्याचे समजले होते. त्याच वेळी, या सर्व कंपन्यांचे रिलायन्स ग्रुपशी अत्यंत जटिल व्यवस्थेद्वारे संबंध असल्याची माहिती समोर आली होती. या 14 खात्यांमध्ये तब्बल 601 दशलक्ष डॉलर्सची रक्कम जमा होती. या 14 कंपन्यांमधून एका कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे लाभार्थी म्हणून अंबानी कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आली होती. 4 फेब्रुवारी 2019 रोजी आयकर विभागाच्या तपास अहवाल आणि 28 मार्च 2019 रोजी पाठवण्यात आलेल्या नोटीसीच्या माहितीवरून हा खुलासा झाला होता. आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसवर इंग्रजी वर्तमानपत्राकडून काही प्रश्न विचारण्यात आले. याला उत्तर देताना ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व बाबींचे रिलायन्सच्या प्रवक्त्यांकडून खंडन करण्यात आले आहे. तसेच आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.