मुंबई – शिवसेनेने आणखी चार बंडखोर आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या नोटिसा जारी केल्या आहेत. शिवसेनेने या आधी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींकडे केली आहे. त्यामुळे अपात्रतेसाठी नोटिसा जारी केलेल्या आमदारांची संख्या आता 16 झाली आहे. या 16 आमदारांना सोमवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले जाईल, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
नव्याने अपात्रतेची नोटीस जारी केलेल्या आमदारांमध्ये संजय रायमुलकर, चिमण पाटील, रमेश बोरनारे आणि बालाजी कल्याणकर या चार आमदारांची नावे आहेत. त्यांना पत्र देऊनही त्यांच्यापैकी कोणीही मुंबईत बुधवारी संध्याकाळी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही, असे सावंत म्हणाले.
पक्षाने यापूर्वीच बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांची नावे उपसभापतींना दिली असून, त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली आहे. आता सेनेत परतण्याचा निर्णय फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात, अन्यथा पक्षाचे दरवाजे कायमचे बंद आहेत असे सावंत म्हणाले.