पाक मंडळाने बजावली नोटीस
लाहोर – पाकिस्तानचा माजी कसोटीपटू शोएब अख्तर याला गेल्या काही दिवसांत केलेली बेताल बडबड भोवली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्याला नोटीस बजावली आहे. मंडळावर तसेच मंडळाच्या कायदा विषयक सल्लागार तौफझुल रिझवी यांच्याबाबत अत्यंत अक्षेपार्ह टीका केल्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, पाक मंडळ तसेच कायदे सल्लागार आणि एकूणच क्रिकेटमधील विविध पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींवर शोएबने टीकासत्र आरंभिले होते. त्यावर संतप्त होत मंडळाने त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सायबर क्राइम नियमांनुसार शोएबविरुद्ध याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही करण्यात येऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या कारवाईबाबत एक मुलाखत देताना शोएबने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची हीच बेताल बडबड आता त्याला चांगलीच भोवणार आहे. त्याच्यावर काही कायदेशिर कारवाई तर करण्यात येणार असून त्याच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला जाऊ शकतो.
शोएब जर या प्रकरणात दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येऊ शकते. शोएबने पीसीबी आणि अन्य कायदेशीर बाबींवर बोलताना काही गोष्टींचे भान ठेवायला हवे होते. त्याने मंडळाचा तसेच कायदेविषयक सल्लागारांचा अपमान केला असून आता केवळ माफी मागून हा तिढा सुटणार नाही, असे संकेतही मंडळाने दिले आहेत.