– भालचंद्र ठोंबरे
एकाच आठवड्यात दोन वेळा दहशतवादी कारवाया करून बीएलएच्या माजीद ब्रिगेडने पाक सेनेला जबरदस्त धक्का देऊन आपला स्वातंत्र्य लढा तीव्र केल्याचे संकेत दिले आहेत.
पाकिस्तानच्या क्वेटावरून पेशावरकडे जाणार्या जाफर एक्स्प्रेसला गुडलास व पिस कुनरीच्या डोंगराळ भागात रेल्वेरूळ उडवून हायजॅक केले होते. या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच क्वेटावरून तात्फानला जाणार्या सेनेच्या पथकाला घेऊन जाणार्या बसवर बीएलएने हल्ला केला व यात 90 सैनिक ठार झाल्याचा दावा बीएलएने केला, तर पाकतर्फे 7 सैनिक ठार व 21 जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये बीएलए, बीएलएफ, टीटीपी आदी संघटनांनी पाकच्या नाकीनऊ आणले आहे. या कारवायांनी धास्तावलेल्या पाक शासनाने खेळण्यातील बंदुकीच्या खरेदी-विक्रीवरही बंदी घातल्याचे वृत्त आहे.
बलुचिस्तानात आज बलुचिस्तानच्या मुक्तीसाठी, बलुच लिबरेशन फ्रंट, बलुच लिबरेशन आर्मी, बलुच रिपब्लिकन गार्ड, बलुच लिबरेशन टायगर, बलुच नॅशनॅलिस्ट आर्मी, युनायटेड बलुच आर्मी आदी संघटना कार्यरत आहेत.
उपेक्षित व पीडित बलुची जनता
बलुचिस्तान हा पाकचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा; पण कमी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 1,34,051 चौरस मैल असून बहुसंख्य लोकसंख्या बलुच आहे. त्यानंतर पश्तुन, ब्राहुई, हजारास, सिंधी, पंजाबी, मिर्री आहेत. येथे मुख्यत्वे बलोची, उर्दू, पश्तो व ब्राहुई भाषा बोलली जाते.
बलुचिस्तानमधून पाकिस्तानला नैसर्गिक गॅस व तेल मिळते तसेच बलुचिस्तानमध्ये कोळसा, सोने, तांबे, युरेनियम आदी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बरीचशी मदत होते. मात्र, यातून बलुचिस्तानला काहीही मिळत नाही. राजकारण, सेना, अन्य संस्था, उद्योगधंदे, यात पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व आहे. बलुचिस्तानातील संसाधनांवर सेनेतील अधिकारी धनवान होत आहेत. तर बलुच जनतेच्या वाट्याला अत्याचार आला आहे. त्यामुळे बलुची जनता त्रस्त झाली आहे.
सरकारी नोकरीत बलुच जनतेला जागा नाहीत. त्यांना गद्दार समजले जाते. त्यातच चीनचा बिल्ड अँड रोड प्रकल्प तसेच बंदरे विकसित कार्यक्रमामुळे चिनी लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे आपल्याच भागात आपण दुर्लक्षित व अल्पसंख्याक होण्यासारखी परिस्थिती होत आहे याची भीती बलुची लोकांना आहे. बलुचिस्तानच्या किनार्यावरील ग्वादर बंदर पाकने चीनला विकसित करण्यासाठी दिलेले आहे. याच बलुचिस्तानमध्ये चगाई येथे पाकिस्तानचे अणू परीक्षण स्थळ आहे. बलुची जनतेची संस्कृती, ओळख, भाषा पाकिस्तानपेक्षा वेगळी आहे. मात्र आपली हीच ओळख पद्धतशीरपणे मिटविण्याचे षड्यंत्र पाक सेना करीत असल्याचा बलुच जनतेचा आरोप असून त्यामुळे त्यांना आता पाकिस्तानपासून अलग व्हावयाचे आहे. या भागात पुरेशा प्रमाणात वाहतूक, वीज, पाणी या सुविधा नसल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही.
बलुच विद्रोह
जबरदस्तीच्या विलीनकरणाविरुद्ध बलुचिस्तानमध्ये पाक विरुद्ध असंतोष उफाळला होता व गेल्या 75 वर्षांपासून याविरुद्ध बलुचिस्तान सतत संघर्ष करीत आहे. अब्दुल करीम यांनी बंडाचे निशाण उभारले, त्यांना कैद करण्यात आले. 1958 मध्ये झालावनचे नबाब नौरोज खान यांनी पाकच्या धोरणाविरुद्ध लढा दिला. मात्र त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून कैदेत टाकण्यात आले. त्यांचा कैदेतच मृत्यू झाला. 1960 मध्ये शेख मुहम्मद बीजराणी मर्री यांचे नेतृत्वात मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला. मात्र, 1969 मध्ये तो दडपण्यात आला.
1973 मध्ये पाक शासनाने बलुचिस्तानचे प्रांतीय सरकार बरखास्त करून मार्शल लॉ लागू केला. त्यामुळे सशस्त्र विद्रोह सुरू झाला. मीर जाफरखान यांनी ‘बलुच पीपल लिबरेशन फ्रंट’ची स्थापना केली. यात मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या मर्री व मेंगल आदिवासींनी संघर्ष केला. हा शमवण्यासाठी इराणच्या मदतीने त्या भागात बॉम्ब वर्षाव करण्यात आला. त्यात अंदाजे सात ते आठ हजार बलुच आंदोलक व नागरिक मरण पावले, तर जवळपास 3 हजारच्या आसपास पाक सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बंडावर काबू मिळविण्यात आला.
जनरल मुशर्रफ यांच्या काळात जानेवारी 2005 मध्ये सुई भागात पेट्रोलियम कंपनीत काम करणार्या एका जोडप्यातील डॉक्टर महिलेवर एका सेनाधिकार्याने बलात्कार केला. त्या अधिकार्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बलुच जनतेने मोर्चा काढला. मात्र मुशर्रफ यांनी हा सेनेला बदनाम करण्याचा डाव आहे, असे म्हणून कारवाई नाकारली. त्यामुळे असंतोष वाढला. पाकिस्तानने 7 एप्रिल 2006 रोजी बीएलएला दहशतवादी संघटना घोषित केले. ऑगस्ट 2006 मध्ये बलुच राज्याचे माजी मंत्री व माजी राज्यपाल राहिलेले व त्यावेळी बीएलएचे नेते असलेल्या नबाब अकबर बुग्ती यांना त्यांच्या सहकार्यासह पाक सेनेने ठार केले. त्यामुळे बीएलएमध्ये तीव्र असंतोष झाला व संघटना अधिक एकवटली.
ब्रह्मदाग बुग्ती हा संघटनेचा नेता झाला तेव्हा त्याने 15 एप्रिल 2009 रोजी गैरबलुच लोकांवर हल्ले करण्याचे आवाहन केले. त्या कारवाईत पाचशे लोक ठार झाले. 2010 मध्ये शैक्षणिक संस्थांनाही लक्ष करण्यात आले. घातपाती कारवायांची तीव्रता हळूहळू वाढू लागली. बलुचिस्तानात असलेल्या व बॅरिस्टर जिनाच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी वास्तव्य केलेली इमारत बीएलएने नष्ट केली व त्यावरील पाकिस्तानचा ध्वज काढून त्यावर बलुचिस्तानचा ध्वज फडकविला. मात्र पाकने पुन्हा त्यावर कब्जा करून इमारत दुरुस्त केली.
2017 मध्ये बीएलए संघटनेत मोठे फेरफार झाले. दोन कमांडर उस्ताद असलम व अकबर जेब यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले. त्यांनी आपला स्वतःचा वेगळा गट बनविला. मात्र पुढे तोच गट मुख्य बीएलए ठरला. असलमच्या काळातच आत्मघातकी पथके निर्माण झाली. 2018 मध्ये चिनी दूतावासावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाक सेनेच्या एका कारवाईत असलम ठार झाला. त्यानंतर अकबर जेब नेता झाला. बीएलएकडे आजच्या घटकेस अंदाजे सहा हजारांच्या आसपास सैनिक असून अंदाजे शंभर महिलांचे आत्मघातकी पथक आहे.
2024 पासून संघटनेने आंदोलन अधिक तीव्र केले. 2024 मध्ये 302 हल्ले करून 580 पेक्षा अधिक लोकांना ठार केले, तर 370 च्या वर लोक जखमी झाले. पूर्वी संघटनेत कबालीचा भरणा असायचा व साधारण जनता असायची. मात्र आता स्त्री, पुरुष, मुले, डॉक्टर, इंजिनिअर आदी सुशिक्षितांचाही सहभाग मिळू लागल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे पाक सेनेची डोकेदुखी वाढली आहे. आता केवळ स्वातंत्र्य हेच बीएलएने आपले ध्येय ठरविले आहे. ते कितपत साध्य होते, हे येणारा काळच ठरवेल.