दखल : नक्षलवादाचा बीमोड आवश्‍यक

– स्वप्निल श्रोत्री

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 2016 सालच्या अहवालानुसार, भारतात सीमेवरील युद्धात लढताना जेवढे जवान धारातीर्थी पडतात त्यापेक्षा जास्त जवान सीमेच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढताना धारातीर्थी पडतात.

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादविरोधी कारवाई करताना सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाल्याची घटना नुकतीच घडली. सदर घटनेमुळे एक गोष्ट अधोरेखित होते की, नक्षलवादाचे आव्हान अजून संपलेले नाही. मागील 10-12 वर्षांच्या नक्षलवादी कारवायांचा अभ्यास केला तर नक्षलवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येते. परंतु, नक्षलवादी हल्ले जरी कमी झाले असले तरी ते जेव्हा झाले तेव्हा धोकादायक झाल्याचे दिसून आले आहे.

बिजापूरमधील घटनेची येत्या काळात उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यातून सत्य बाहेर येईलच. परंतु गुप्तचर खात्याचे अपयश हा नक्षलवादविरोधी कारवाईत कळीचा मुद्दा बनल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. बिजापूरच्या घटनेत नक्षलवाद्यांनी जवानांना “यु शेप ट्रॅप’मध्ये फसविल्याचे दिसून आले. कोम्बिंग ऑपरेशन करताना जवान जंगलात बरेच आत गेले (किंबहुना नक्षलवाद्यांनी त्यांना येऊ दिले) आणि नंतर तिन्ही बाजूने जवानांवर एकदम हल्ला करीत बेछूट गोळीबार केला. परिणामी, 22 जवान जागीच शहीद झाले, तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले.

गेल्या वर्षी ह्याच काळात (21 मार्च 2020 रोजी) अशाच प्रकारचा हल्ला नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या चिंतागुफा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुर्कापाल जंगलात केला होता. त्यावेळीसुद्धा जवानांसाठी असाच ट्रॅप बनविला होता. त्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले होते. थोडक्‍यात, गुप्तहेर खात्याचे अपयश आणि त्याच-त्याच चुका पुन्हा करणे आपणास भोवल्याचे दिसून येते.

2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारतात नक्षलवाद/माओवाद ही प्रमुख राष्ट्रीय आपत्ती असल्याचे वक्‍तव्य केले होते. त्यानंतर पुढील काही वर्षे भारत सरकारने नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडल्यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र होते. अनेक नक्षलवादी नेते ह्या काळात मारले गेले तर काहींनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे 2015 पासून नक्षलवादी चळवळीला एक प्रकारची मरगळ आली असल्याचे चित्र होते. परंतु, नुकतेच नक्षलवाद्यांनी ज्याप्रमाणे सीआरपीएफ व कोब्रा बटालियनच्या जवानांवर हल्ला केला त्यावरून नक्षलवादाचे आव्हान भारतासाठी आजही गंभीर असल्याचे चित्र आहे. नक्षलवादाचा संपूर्ण बीमोड जर भारतीय सुरक्षा यंत्रणांना करायचा असेल तर खालील उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

1) भारतीय संरक्षण क्षेत्राचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, भारताच्या विविध भागांत विविध उद्देशांसाठी सुरक्षा यंत्रणांचे वेगवेगळे गट सक्रिय आहेत. जसे शहरी दहशतवादाशी लढण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत एनएसजी कमांडोंची मदत घेतली जाते, बॉंबहल्ल्यांना रोखण्यासाठी बॉंबस्कॉड आहे, नक्षलवादी व माओवादी यांच्याशी लढण्यासाठी कोब्रा कमांडो आहेत, पाकिस्तान व बांगलादेश सीमेवर बीएसएफ आहे, ईशान्येतील दहशतवाद रोखण्यासाठी व आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्यासाठी आसाम रायफल्स तैनात आहे, नेपाळ, भूतान सीमेवरून अवैध तस्करी रोखण्यासाठी सशस्त्र सीमा बल आहे, देशातील अंतर्गत गुप्तहेर खाते म्हणून “आयबी’ तर सीमेबाहेरील गुप्तहेर खाते म्हणून “रॉ’ काम करते आणि या सर्वांना स्थानिक ऑपरेशनमध्ये मदत करण्यासाठी स्थानिक पोलीस व इतर सरकारी संस्था असतात.

परंतु, या सर्वांमध्ये कायमच समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र भारतात प्रकर्षाने जाणविते. बऱ्याचवेळा एकच ऑपरेशन करताना वेगवेगळ्या संस्था स्वतंत्रपणे काम करताना दिसतात. परिणामी “ऑपरेशन फेल’ होण्याचा धोका अधिक असतो. भारतीय लष्करात यापूर्वी हीच परिस्थिती होती. 1999 सालच्या कारगील युद्धाच्या वेळी त्याचा अभाव प्रकर्षाने जाणविला. परिणामी, केंद्र सरकारने ले. ज. दत्तात्रय शेकटकर समितीच्या सूचनेनुसार लष्कराच्या तीनही तुकड्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी “सर सेनाध्यक्ष’ (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) हे नवीन पद निर्माण केले आहे.

2) सीआरपीएफ हे केंद्राचे “ऑल टाइम फेव्हरेट’ शस्त्र आहे. देशाचे अंतर्गत सुरक्षेला कोठेही धोका निर्माण झाला की सीआरपीएफची मदत घेतली जाते. जम्मू-काश्‍मीरमध्ये बर्फात दहशतवाद्यांशी लढताना आपणास सीआरपीएफचे जवान दिसतात, छत्तीसगडमध्ये जंगलात नक्षलवादी/माओवादी यांच्याशी लढताना सीआरपीएफचे जवान दिसतात तर ईशान्येतील डोंगर आणि दऱ्यांमध्ये स्थानिक समाजविघातक टोळ्यांशी लढताना सीआरपीएफचेच जवान दिसतात. देशात कोठेही काहीही झाले की सीआरपीएफ बोलवा हे धोरण बदलावे.

3) गुप्तहेर खात्याचे अपयश हा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून ह्यावर काम करणे गरजेचे आहे. कंदाहार विमान अपहरणापासून ते आता झालेल्या नक्षली हल्ल्यापर्यंत गुप्तहेर खात्याचे अपयश वेळोवेळी दिसून आले आहे. काळ बदलला आहे त्याचप्रमाणे समाज विघातकशक्‍तींची काम करण्याची पद्धतसुद्धा बदलली आहे. नवनवीन तंत्रज्ञान बाजारात सहज उपलब्ध आहे आणि त्याचा वापर ह्या लोकांकडून झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपण त्यांच्या दोन पावले पुढे राहण्याची गरज असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रे आणि शस्त्रे केंद्राने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.