नोंद : उशिरा साक्षात्कार!

– हेमंत देसाई

मोदी राजवटीस जवळपास सात वर्षे पूर्ण झाली असून, भाजपवर प्रतिहल्ला करण्यासाठी सर्वजणांना एकत्र येण्याची गरज आहे, याचा उशिरा का होईना, विरोधी पक्षांना साक्षात्कार होऊ लागला आहे.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवले आहे. प. बंगाल व अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपविरोधात रणनीती आखण्यासाठी एक बैठक घेऊ या, असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे. लोकशाही आणि भारतीय संविधानावर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि देशातील जनतेसमोर नवा पर्याय ठेवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळेच ममतादीदींनी या लेटरबॉंबचे अस्त्र बाहेर काढले आहे, अशा आशयाची टीका भाजपने केली आहे. वास्तविक 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीदेखील दीदींनी भाजपविरोधी मोर्चेबांधणी केली होती.

प. बंगालमध्ये झालेल्या महामेळाव्यात वेगवेगळ्या विरोधी पक्षनेत्यांनी हातांची साखळी करून, “हम एक हैं’चा नारा दिला होता. मात्र प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढत होते व लढत आहेत. शिवाय विरोधी आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे, हे अद्याप ठरलेले नाही. खरे तर प. बंगालमध्ये तृणमूलपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या, तरीदेखील कॉंग्रेस व डावी आघाडी यांच्यासह तृणमूलला महाआघाडी उभी करता येईल. महाराष्ट्राप्रमाणे प बंगालात निवडणुकीनंतरची महाआघाडी अस्तित्वात येऊ शकते, या पद्धतीने भाजपला दूर ठेवता येणे शक्‍य आहे. अर्थात हे सर्व निवडणूक निकाल कसे लागतात, त्यावर अवलंबून असेल. मात्र देशस्तरावर भाजपविरोधी आघाडी करायची असल्यास, त्या आघाडीचा नेता कोण, हे ठरवावे लागेल.

तसेच आजपर्यंतच्या आघाडी सरकारच्या प्रयोगाबद्दल जनतेचा अनुभव अत्यंत भयानक आहे. शिवाय आघाडीतील काही पक्ष केंद्रात एकत्र आणि राज्यात एकमेकांच्या विरोधात, अशा विसंगती निर्माण होऊ शकतात. शिवसेना नेते संजय राऊत यांनी संयुक्‍त पुरोगामी आघाडी- दोनची कल्पना मांडली असून, याचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असे म्हटले आहे. सध्या संपुआचे नेतृत्व सोनिया गांधींकडे आहे आणि त्यांच्या जागीच पवार यांची निवड व्हावी, अशी प्रचार मोहीमच राऊत यांनी हाती घेतली आहे. जर सोनियांनी जागा खाली केली नाही, तर संपुआ- दोनची स्थापना करू, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर दीदींनी जे पत्र लिहिले आहे, त्यात दिल्लीत लोकनियुक्‍त सरकारच्या तुलनेत नायब राज्यपालांना देण्यात आलेल्या जादा अधिकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. मोदी सरकारला राज्यांचे अधिकार कमी करून, संपूर्ण देशात एकपक्षीय हुकूमशाही स्थापन करायची आहे, असे दीदींनी म्हटले आहे. द्रमुकचे एम. के. स्टालिन, वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी, बीजेडीचे नवीन पटनायक, तेलंगण राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल प्रभृतींना दीदींनी हे पत्र धाडले आहे. दीदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, बहुतेक राजकीय पक्षांनी त्यांना समर्थनाचे पत्र पाठवले आहे. शरद पवार यांनी एक ते तीन एप्रिल असा प. बंगालचा दौरा नक्‍की केला होता. ते तेथे जाऊन तृणमूल कॉंग्रेसचा प्रचार करणार होते. परंतु त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. पवारांनी प. बंगालमध्ये जाऊन तृणमूलचा प्रचार बिलकुल करू नये, असे आवाहन कॉंग्रेसने केले होते. त्यास पवारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट दौऱ्यावर जाता आले नाही, तरी दीदींना पाठिंब्याचे पत्र पवारांनी पाठवले आहे.

एकजूट न उभारल्यास, भाजपयुक्‍त आणि विरोधी पक्षमुक्‍त भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल. तृणमूल कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न सर्वशक्‍तिनिशी सध्या सुरू आहे. त्यासाठी दीदींना हिंदुविरोधी ठरवले जात आहे. बेगम ममता, खाला ममता, फुफू ममता, असा त्यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जात आहे. भाजपचा विजय न झाल्यास आणि तृणमूल पुन्हा सत्तेवर आल्यास, हिंदू स्त्रिया सुरक्षित राहणार नाहीत, असा प्रचारही केला जात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत “हिंदु खतरे में’चे वातावरण निर्माण करण्यात आले होते. “नवी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला वेगवेगळ्या तपास यंत्रणांमार्फत त्रास देण्यात आला. याच पद्धतीने उद्धव ठाकरे सरकारविरुद्धही तपास यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आपापसातले मतभेद बाजूला ठेवून, भाजपविरोधात सर्व पक्षांची मोट बांधली जाणे अनिवार्य आहे. प. बंगालमध्ये प्रचारासाठी न जाऊन, राहुल व प्रियंका गांधी यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूलला रस्ता प्रशस्त करून दिला आहे. परंतु तेथे तिरंगी लढत निर्माण करण्यात कॉंग्रेस व डाव्यांना यश मिळालेले नाही. उलट मुस्लीम मतांमध्ये फूट घडवून, कॉंग्रेस व डावे भाजपचा फायदा करून देतील की काय, अशीही शक्‍यता वाटते.

प.बंगालला वाचवण्यासाठी तृणमूल व भाजप दोघांचाही पराभव करा, या मुद्‌द्‌यावर डाव्यांचा जोर आहे. मात्र या अशा संदिग्ध भूमिकेमुळे भाजपचाच फायदा होऊन, डावे स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा धोंडा पाडून घेतील. भाजप आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ही पूर्वीची डाव्यांची लाइन होती. त्यामुळे भाजप व हिंदुत्ववादी शक्‍ती मजबूत होत गेल्या. भूतकाळातील चुकांपासून डावे काही शिकतील, अशी शक्‍यता वाटत नाही. मात्र अन्य भाजपेतर पक्षांनी तरी शहाणपण दाखवून दीदींच्या पत्रातील आशयाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.