नोंद : उदंड झाल्या सुट्ट्या

– प्रतीक्षा पाटील
सरकारी सुट्ट्या हा कोणत्याही देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असतो. भारत हा सुट्ट्यांचा देश आहे, असं अनेकदा उपहासानंही म्हटलं जातं.
भारतीय लोक उत्सवप्रिय असल्याने अनेक सण साजरे करीत असतात. त्या सणांना सरकारी सुट्ट्या न दिल्यास सणप्रिय लोक नाराज होतात. म्हणून जवळपास सगळ्या महत्त्वाच्या सणांना सरकार सुट्ट्या देत असते. आज जमाना बदलला आहे आणि जगण्याचे सारे संदर्भ बदलले आहेत. या बदलत्या काळात बरेच सण हे औपचारिकता राहिले आहेत. कित्येक जण ते सण साजरेही करत नाहीत; पण त्यानिमित्तानं सुट्टी मात्र दिली जाते. भारतात अनेक धर्मांचे लोक राहात असल्याने
अशा सणांची आणि सुट्ट्यांची संख्या मोठी झाली आहेे. सरकार दरवर्षी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यामध्ये तीन राष्ट्रीय सुट्ट्या (प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती) अनिवार्य असतात. याखेरीज केंद्र आणि राज्य शासनांच्या स्तरावर विविध सण, धार्मिक आणि प्रादेशिक दिवसांना सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात. चालू महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल 2025 मध्ये सरकारी सुट्ट्यांची संख्याच इतकी अधिक आहे की, यामुळे बँका, सरकारी कार्यालये बंद राहिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अर्थात, हे यावर्षी झाले आहे असे नाही. विविध सण, राष्ट्रीय दिवस, धार्मिक उत्सव आणि रविवार यांच्या एकत्रित संयोगाने या महिन्यात उद्योग, सेवा आणि वित्त क्षेत्रांमध्ये कामकाजाची घडीच विस्कटते. सुट्ट्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व मान्य करतानाच बदलत्या काळात त्यांचा अर्थकारणावर होणारा प्रभावदेखील तपासणे गरजेचे आहे, असा एक मतप्रवाह सध्या पुढे येत आहे.
सुट्ट्या ही एक गरज मानली जाते. मात्र, ज्या वेळी सुट्ट्यांची संख्या आणि कालावधींचा अतिरेक होत जातो, तेव्हा अर्थव्यवस्थेच्या चाकांना ब्रेक लागल्यासारखी स्थिती निर्माण होते. या महिन्यात एकूण 10 पेक्षा जास्त दिवस बँका, शासकीय कार्यालये, उद्योग आणि शाळा बंद राहणार आहेत. 15 एप्रिलला बंगाली नववर्ष दिन, हिमाचल दिन, बोहाग बिहू यामुळे निवडक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 16 एप्रिलला आसामी नववर्षानिमित्त गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्टी आहे. 21 एप्रिल रोजी गरिया पूजेमुळे त्रिपुरात आगरतळामध्ये बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. 29 एप्रिल रोजी श्री परशुराम जयंतीनिमित्त शिमल्यामध्ये बँक हॉलिडे असणार आहे. 30 एप्रिल रोजी बसवेश्वर जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
लागोपाठ येणार्या या सुट्ट्यांमुळे बँकिंग व्यवहार, सरकारी निर्णय प्रक्रियेला विलंब होणार आहे. मोठे आर्थिक व्यवहार, कर्ज प्रक्रिया, सरकारी अनुदानाचे वितरण आणि करसंकलन यावर याचा थेट परिणाम होईल. तसेच, शेअर बाजारही काही दिवस बंद राहिल्याने गुंतवणूकदारांच्या हालचाली मर्यादित होणार आहेत. लघुउद्योग आणि व्यापार्यांचे नियमित उत्पन्न चक्र, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सेवा आणि रोजंदारीवर चालणार्या कामगारांवर याचा मोठा आर्थिक परिणाम होतो. कारण अशा उद्योगांसाठी सातत्य महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक सुट्टीनंतर ‘वर्क बॅकलॉग’ निर्माण होतो, जो कार्यक्षमतेवर परिणाम करतो.
सार्वजनिक सुट्ट्यांबाबत जगभरातील इतर देशांशी तुलना करावयाची झाल्यास जपानमध्ये वार्षिक सरकारी सुट्ट्यांची सरासरी 16 दिवस इतकी आहे. अमेरिकेत हे प्रमाण 11 दिवस असे आहे. तेथे सर्वच सुट्ट्या अनिवार्य नाहीत. फ्रान्समध्येही 11 दिवस राष्ट्रीय सुट्ट्या आहेत. यावरून भारतात सरकारी सुट्ट्यांची संख्या इतर अनेक देशांच्या तुलनेत जास्त असल्याचे लक्षात येते. भारतात धार्मिक, प्रादेशिक विविधतेमुळे सुट्ट्यांचे विभाजन असंख्य गटांमध्ये होते. यामुळे कामकाजाच्या दिवशी विविध ठिकाणी ङ्गरक जाणवतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुट्टी मिळते, तर तामिळनाडूमध्ये पोंगल किंवा केरळमध्ये ओणमला. या स्थानिक सणांमुळे बँकिंग, प्रशासकीय, शैक्षणिक आणि उद्योग व्यवहारांमध्ये असमतोल निर्माण होतो.
गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक प्रवाहांच्या अनुकरणार्थ पाच दिवसांचा आठवडा ही नवी संकल्पना उदयास आली आहे. वर्षाच्या 365 दिवसांमध्ये जवळपास 150 हून अधिक दिवस सुट्ट्यांचेच असतील तर असा देश प्रगती कशी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो. सुट्ट्यांची आवश्यकता नाकारता येणार नाही, मात्र त्याचे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीने केले पाहिजे. एकाच महिन्यात इतक्या सुट्ट्या न देता, त्या विभागून दिल्यास आर्थिक चक्र अबाधित राहू शकते. तसेच, बँकिंगसारख्या काही सरकारी सेवांसाठी पर्यायी व्यवस्था तयार केल्यास कामकाज सुरळीत राहू शकते.
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार जगात सर्वात जास्त सार्वजनिक सुट्ट्या भारतात असतात. पोर्तुगाल सरकारने मागील काळात आपला खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी 14 सरकारी सुट्ट्यांची संख्या कमी करत 10 वर आणली होती. ग्रेट ब्रिटनमधील एका सर्वेक्षणानुसार तिथे प्रत्येक सुट्टीमुळे बँकांना 230 कोटी पाउंड म्हणजेच, 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले की, बँकांना सुट्टी नसेल, तर ग्रेट ब्रिटनचा विकास 1.3 टक्के इतका वाढू शकतो. हाच निकष कमी-अधिक ङ्गरकाने भारतासही लागू होतो.
आज नागरी समस्यांचा डोलारा इतका प्रचंड वाढलेला असताना आणि सरकारी कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना इतक्या सुट्ट्या दिल्या जाणार असतील तर सामान्यांचा त्रागा वाढणं स्वाभाविक आहे. सरकारी कर्मचार्यांना सुट्टी देताना त्यांचा पगार मात्र कायम राहतो आणि तो जनतेच्या कररूपी पैशातून दिला जातो. आज सरकारी कार्यालयांमधील किंवा बँकांमधील एका कर्मचार्याचे दिवसाचे वेतन हे किमान 2000 रुपये इतके आहे. यावरून सुट्ट्यांमुळे सामान्यांचे किती पैशांचे नुकसान झालं असेल याचा अंदाज येईल. यामुळे सामान्य माणूस नाराजीपूर्वक प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याला चुकीचे ठरवता येणार नाही.
प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अत्युच्च आणि अत्युत्तम योगदान देण्यासाठी कार्यप्रवण केलं तर त्यातून देशाच्या प्रगतीला, विकासाला हातभार लागेल आणि सबंध समाजाचं हित साधलं जाईल. पण आधुनिकतेचा उद्घोष जितक्या जोमानं केला जातो तितक्या गांभीर्यानं कृती केली जात नाही, ही आपली खरी शोकांतिका आहे. समाजात महान व्यक्तिमत्त्वं म्हणून ज्यांना अधिमान्यता मिळते त्यांनी अत्यंत कष्टातून, संघर्षातून वाटचाल केलेली असते. या परिश्रमांच्या जोरावरच त्यांना शून्यातून विश्वनिर्मिती करता येणं शक्य होतं आणि म्हणूनच समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो.
या प्रत्येक महापुरुषानं समाजाप्रतीचं आपलं दायित्व म्हणून भरभरून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामागचा उद्देश इतकाच की आपल्या योगदानानं सामान्यांचं जगणं सुखकर व्हावं. अशा व्यक्तिमत्त्वांचे आदर्श घेऊन वाटचाल करताना कार्यमग्नतेला अनुरूप रचना असायला हवी. कारण अशी कार्यसंस्कृती, श्रमसंस्कृतीच देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवेल.





