दखल : दहशतवादाला खतपाणी?

संपूर्ण देशाप्रमाणे काश्‍मीरमध्येही करोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच तेथील सुरक्षा दलांना करोनाबरोबरच दहशतवाद्यांना तोंड द्यावे लागत आहे. करोनाचा कहर सुरू असूनही पाकिस्तान जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवायांना चिथावणी देत आहे.

काश्‍मीरमधील दहशतवादाचा स्थानिक चेहरा रियाझ नायकूला ठार करण्यात आले. त्याकरिता काश्‍मीर खोऱ्यात तैनात असलेल्या, भारतीय सैन्याचे अभिनंदन केले पाहिजे. “हंडवारा घटनेचा बदला’ घेतला गेला. दोन वेळा शौर्याबद्दल सेना पदक मिळवलेले कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनुज सूद यांनी हंडवारामधील मोहिमेत तीन दहशतवाद्यांना मारताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. नायकूला संपवण्याची मोहीम काही आठवडे सुरू होती. खडतर टप्प्यांमधून मोहीम जाऊन नायकूचे परिमार्जन केले गेले. अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्याच्या वापसीनंतर पाकिस्तान तालिबान अफगाणी दहशतवाद्यांना काश्‍मीर खोऱ्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे हिंसाचार अजून वाढण्याची शक्‍यता आहे.

नायकू “ए प्लस प्लस’ दहशतवादी
2016 मध्ये हिज्बुलचा म्होरक्‍या बुरहान वानी मारला गेल्यानंतर त्या संघटनेची सूत्रे रियाझ नायकूकडे आली. बुरहानने समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. नायकूने काश्‍मिरी तरुणांना चिथावण्याचे काम केले. सुरक्षा दलांशी दोन हात करून आपलीच हानी अधिक होते, हे कळून चुकल्यामुळे नायकूने अनेक सर्वसामान्य काश्‍मिरींना भारतीय लष्कराचे खबरी आहेत, असे सांगून क्रूरपणे मारले. त्या हत्येचे चित्रीकरण करून ती चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसृत करणे हा त्याचा आवडीचा उद्योग होता. पोलीस किंवा लष्करी जवानांचे, ते गावी सुट्टीवर आलेले असताना अपहरण करणे आणि त्यांची हत्या करणे हे प्रकार देखील नायकूने केले. यानंतर त्याने बाहेरील राज्यांतून आलेले स्थलांतरितांना, मजूर, फळ व्यापारी, ट्रकचालक यांच्या हत्या करण्याचा पायंडा पाडला. नायकूला पकडण्यासाठी 12 लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेचा प्रभाव काश्‍मीर खोऱ्यात वाढविण्यास नायकूने मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. खंडण्या गोळा करणे, आपल्याविरुद्ध काम करणाऱ्यांची हत्या करणे याबद्दल त्याची ख्याती होती. काश्‍मीर खोऱ्यामध्ये भारतविरोधी तत्त्वे अजूनही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.

काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने तो खंडित करण्याची स्वप्ने पाहण्याचे आणि पाकिस्तानच्या तालावर नाचण्यामध्ये या हिज्बुलच्या दहशतवाद्यांनी सोडून देण्यातच त्यांचे हित आहे. शहाणे न झाल्यास त्यांचीही गत रियाझ नायकू यांच्याप्रमाणे आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्‍की. जानेवारीपासून काश्‍मीरमध्ये 80 अतिरेकी मारले गेले आहे. याची किंमत सैन्याने 25 सैनिकांच्या बलिदानाने दिली आहे. नायकू आणि त्याचा साथीदार अदिल अहमद यांच्या हत्येमुळे हिज्बुल मुजाहिदीन संघटनेला जबरदस्त हादरा बसला आहे.

दहशतवाद्यांचे अंतिम क्रियाकर्म
नायकूचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला गेला. येथून पुढे चकमकीत मारल्या गेलेल्यांची नावेही जाहीर न करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. दोन्ही निर्णय स्तुत्य आहेत. मारलेल्या दहशतवाद्यांचे अंतिम क्रियाकर्म हा काश्‍मीर खोऱ्यामध्ये एक मोठा कार्यक्रम बनायचा. हजारो, लाखोंच्या संख्येने आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना तिथे जाण्यास भाग पाडले जायचे. या दहशतवाद्याची खूप स्तुती करून त्याला एक आजादी करता लढणारा योद्धा म्हणून स्तुती केली जायची. या सगळ्यामुळे अनेक नवीन काश्‍मिरी युवकांना दहशतवादामध्ये सामील व्हायची प्रेरणा मिळायची.

म्हणून आता यापुढे दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे दिले जाणार नाही आणि मारलेल्या दहशतवाद्यांची नावेसुद्धा घोषित केले जाणार नाही. सध्या दहशतवाद हा आता फक्‍त काश्‍मीर खोऱ्यामध्ये आहे.तिथे असलेले काश्‍मिरी दहशतवादी फारसे उपयुक्‍त नाही, म्हणून कडवे पाकिस्तान अफगाणी आणि पाकिस्तानी दहशतवादी काश्‍मीर खोऱ्यामध्ये घुसवत आहे. हंडवारा मोहिमेमधले दहशतवादी हे पाकिस्तानी सैन्याचे कमांडो होते, त्यांना पाकिस्तानी सैन्याने तिथे दहशतवाद वाढवण्याकरता पाठवले होते. यांच्याविरुद्धच्या मोहिमेमध्ये कर्नल आशुतोष आणि मेजर अनुज यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. 

दहशतवादी कारवायांना चिथावणी
पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ल्यांच्या सातत्याने वाढणाऱ्या घटनांतून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावानुसार वागत आहे. यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांतच पाकिस्तानने 1 हजार 144 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तर गेल्या दोन वर्षांत म्हणजे 2019 आणि 2018 मध्ये क्रमशः 685 व 627 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. काश्‍मीरविषयक महत्त्वाची एक घडामोड म्हणजे, पाकव्याप्त काश्‍मीर (मुझफ्फराबाद जिल्हा) आणि गिलगिट-बाल्टिस्तान येथील हवामान अंदाज आणि वृत्तही भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) प्रसृत केले जाणार आहे.

दहशतवादी हल्ले, घुसखोरी
वर्तमान परिस्थिती इशारा देत आहे, येत्या काही दिवसांत निराश व वैफल्यग्रस्त पाक आपली हताशा अपरिपक्‍व कामांच्या किंवा दहशतवादी हल्ले, घुसखोरी यांसारख्या कारवायांतून बाहेर काढू शकतो. नायकू याच्या हत्येनंतर केरळमध्ये जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संबंधित असलेल्या एका नजी मेहरादाद तरुणाने, आमचे काश्‍मिरी तरुण चोवीस तासांच्या आत या हत्येचा बदला घेतील, अशी प्रतिक्रिया फेसबुक पेजवर पोस्ट केली होती. त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पण, दुसरीकडे त्याच्या त्या कृतीचे समर्थन करणारेही आपल्या देशातच आहेत. अशा प्रवृतींना, मग त्या काश्‍मीरमधील असोत वा केरळमधील, त्यांना नष्ट केले पाहिजे.

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.