दखल : स्वस्ताईची “डाळ’ शिजेना

– नवनाथ वारे
दैनंदिन आहारातील प्रथिनांचा पोषक खजिना असणाऱ्या डाळींच्या भावांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तुरडाळीचे किरकोळ बाजारातील भाव 150 रुपयांपुढे गेले; तर मूगडाळीनेही शंभरी पार केली आहे. भाज्या महागल्या म्हणून डाळी खाव्यात तर तशीही सोय आता राहिलेली नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात धान आणि तूरडाळीच्या शेतीचे क्षेत्र कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार धान लागवडीखालील क्षेत्र 34 टक्के आणि तूर लागवडीखालील क्षेत्र 65 टक्क्यांनी कमी झाले आहे. खरिपाच्या हंगामात सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 34 टक्के घट झाली. देशात डाळींचा सर्वात मोठा उत्पादक, सर्वांत मोठा ग्राहक आणि आयातदार असूनही भारताला डाळींबाबत स्वयंपूर्णतः मिळवण्यात यश आलेले नाहीये. विशेषत: डाळीच्या शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याने हा प्रश्न आणखीच गंभीर झाला आहे. जगात उत्पादन होणाऱ्या डाळीत सुमारे 28 टक्के डाळ भारतातच उत्पादित होते. देशाच्या खाद्यातील एकूण उत्पादनात डाळीचा वाटा सात ते दहा टक्के आहे. जगभरात जेवढ्या प्रमाणात डाळीचे सेवन केले जाते, त्यापैकी 27 टक्के डाळ भारतातच विकली जाते. डाळीची शेती ही रब्बी आणि खरीप अशी दोन्ही हंगामात होते. रब्बीच्या हंगामात एकूण उत्पादनात 60 टक्के वाटा डाळीचा राहतो.
देशातील सहा प्रमुख उत्पादक राज्यांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. डाळीचे एकूण उत्पादनात या राज्यांचा वाटा सुमारे 80 टक्के आहे. पूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड होत असे. मात्र, आता या भागातील शेतीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळीच्या लागवडीचे क्षेत्र सुमारे 65 हजार हेक्टरने कमी झाले आहे. एवढेच नाही तर धानच्या शेतीचे क्षेत्र देखील 34 हजार हेक्टरने कमी झाले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी 119 लाख हेक्टर भागात डाळीतील सर्वात प्रमुख तुरीची लागवड झाली होती. यावर्षी त्यात घसरण होऊन ती 65 हजार हेक्टरवर राहिली आहे. दुसरीकडे, किरकोळ बाजारात डाळींच्या किमतीही सामान्य ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या ठरताहेत. गेल्यावर्षी त्याच्या उत्पादनात 8 लाख टनने घसरण झाल्याने किमतीत वाढ झाली.
खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या उडिदाच्या शेतीचे क्षेत्र देखील 30 हजार हेक्टरने कमी झाले आहे. यावर्षी 55 हजार हेक्टरवरच उडिदाची लागवड होऊ शकली आणि यावर्षी हा आकडा 79 हजार हेक्टरपर्यंत पोहोचला. खरिपाच्या हंगामात सोयाबीनच्या शेतीचे क्षेत्र देखील 115 लाख हेक्टरवरून 99 हजार हेक्टरवर आले. डाळीच्या शेतीत शेतकऱ्यांना खर्चाची वसुली होत नाही. मात्र, बाजारात त्याची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहते. कृषितज्ज्ञांच्या मते, डाळीच्या शेतीत विविध समस्या असण्याबरोबरच वाढता लागवडीचा खर्च पाहून शेतकरी दुसऱ्या पिकाची निवड करत आहे. यामुळे उत्पादनात घट होत चालली असून देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे. डाळीच्या शेतीला पाणी कमी लागते आणि जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण वाढत त्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मदत करते.
केंद्र सरकारच्या मते, गेल्या पाच ते सहा वर्षांत भारतात डाळ उत्पादन 140 लाख टनांवरून 240 लाख टनांपर्यंत करण्यात आले. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत मागणी अधिक वेगाने वाढू लागली आहे. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2050 पर्यंत सुमारे 320 लाख टन डाळीची गरज भासणार आहे. अशा वेळी डाळींचे क्षेत्र वाढविले नाही तर आयातीवरचे अवलंबित्व कमी होणे कठीण राहू शकते. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1951 मध्ये डाळींची उपलब्धता प्रति व्यक्ती प्रति वर्ष 2211 किलो होती आणि ती 2021 मध्ये कमी होत 1614 किलो राहिली आहे.
महाराष्ट्रासारख्या डाळ उत्पादक राज्यात रब्बी आणि खरिपाच्या हंगामात मूग आणि उडिदाच्या ठिकाणी सोयाबीन घेतले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, तूर घेणाऱ्या क्षेत्राची व्याप्ती अलीकडच्या काळात वाढलेली दिसत नाही. तसेच सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने आणि लगेच रोख मिळत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे ओढा वाढला. सोयाबीनचे पीक केवळ 110 दिवसांत येते आणि त्याचे उत्पादन प्रति एकर 7 ते 8 क्विंटल होते. तुरीच्या उत्पादनासाठी 152 ते 183 दिवस लागतात. तसेच त्याचे उत्पादन एका एकरावर सरासरी तीन ते चार क्विंटल होते. परिणामी, तुरीच्या ऐवजी सोयाबीन हे फायद्याचा सौदा ठरत आहे. त्याला योग्य भावही मिळत आहे. मात्र डाळ लागवडीचा खर्च हा त्याच्या किमान आधारभूत मूल्याच्या समान किंवा त्यापेक्षा अधिक असतो.
अशावेळी डाळीची शेत कोण करणार? सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात राहते आणि ते डाळीच्या तुलनेत लवकर तयार होते. शेत मोकळे राहिले तर तेवढ्या काळात दुसरे पीक घेता येते. किमान आधारभूत मूल्यांच्या कक्षेत उडीद, मूग, तूर, हरभरा, मसूर या पाच डाळींचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाबच्या शेतकऱ्यांकडे पाणी आणि सिंचन चांगले असल्याने त्यांनी दुसऱ्या पिकांचा मार्ग निवडला आहे. डाळीच्या शेतीतून शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे दिसत असले तरी बाजारातील त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या कारणांमुळे प्रत्येक घरात दररोज डाळीचे वरण केले जात असताना आता आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच डाळ शिजविली जाते. कृषितज्ज्ञ श्रीजित कुमार विश्वास म्हणतात, की हवामान बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक घटना आणि मुसळधार पावसामुळे पिकांची स्थिती बिघडली आहे. सरकारने डाळीच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरेसा निधी दिला नाही आणि त्याच्या एमएसपीत वाढ केली नाही तर सर्वसामान्य ग्राहक डाळीपासून आणखी दूर जातील.





