नोंद : 1947 मध्ये लडाख वाचविणारे शूर सैनिक

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

“येथील जमीन नापीक असून खिंडी एवढ्या उंच आहेत की केवळ उत्तम मित्र किंवा भयंकर शत्रूच इथे येऊ इच्छितील’- एक लडाखी म्हण.  भारत-चीनदरम्यान 1947च्या लडाखच्या लढाईतील शूर सैनिकांची एक आठवण…

भारताच्या नकाशातील मुकुटमणी, लडाख, मध्य आशियातून लेहशी होणाऱ्या वस्तुविनिमय (बार्टर) व्यापार करणाऱ्यांच्या दळणवळणाचा मार्ग होता. सिंधू, झास्कर आणि शायॉक नद्यांच्या खोऱ्यांतून, 18 हजार फुटांहून अधिक उंचीच्या, लगतच्या पर्वतांतून, नैसर्गिक मार्ग तयार झालेले होते. रेशीम मार्गापासून व्यापाऱ्यांचे जथ्थे चिनी तुर्कीस्तानमधून काराकोरम खिंड पार करून शायॉक नदीच्या खोऱ्यातून लेहपर्यंत आणि नंतर सिंधू खोऱ्यातून लेहच्या पश्‍चिमेकडील स्कार्डू आणि गिलगिटपर्यंत जात असत. ह्या मार्गावरून दक्षिणेकडे वळल्यास कारगील आणि जोझिला पार करून श्रीनगरपर्यंत जात असत. लेहच्या आग्नेयेस रोहतांग खिंडीद्वारे मनालीपर्यंत पोहोचत असत. समुद्रसपाटीपासून खूप जास्त असलेल्या उंचीवरील ही थंड मरूभूमी, सरासरीने 11 हजार फूट उंचीवर, लडाखपासून पश्‍चिमेकडे जाणाऱ्या सिंधू खोऱ्यावर वसलेली आहे.
1845-46 च्या ब्रिटिश-शीख युद्धानंतर आणि 1846 च्या अमृतसर करारानंतर लडाख, बाल्टिस्तानसहित जम्मू आणि काश्‍मीरवर महाराजा गुलाबसिंह यांनी ताबा मिळवला होता. अफगाणिस्तान आणि रशियाच्या सीमांशी जोडलेले असल्याने ब्रिटिशांना बाल्टिस्तानमध्ये सामरिक/व्यूहरचनात्मक स्वारस्य होते. त्यामुळे ह्या भागात कायमच त्यांचा हस्तक्षेप होत होता. याचे पर्यवसान, नगर, हुंझा, गिलगिट आणि स्कार्डूची संपूर्ण भूमी महाराजांनी ब्रिटिशांना 1935 मध्ये 60 वर्षांकरता भाड्याने देण्यात झाले. 15 ऑगस्ट, 1947 रोजी ब्रिटिशांचे सार्वभौमत्व संपुष्टात आल्याने, हा प्रदेश तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरपणे 30 जून 1947 रोजी जम्मू-काश्‍मीरमध्ये दाखल झाला.
लेफ्टनंट कर्नल थापा यांची लढाई-ब्रिटिश पॉलिटिकल एजंटाने, जम्मू आणि काश्‍मीरच्या महाराजांनी नियुक्‍त केलेल्या गिलगिटच्या गव्हर्नरांच्या हाती 30 जून, 1947 रोजी, हा प्रदेश सुपूर्त केला. ह्या वेळी निर्णयात एक घातक चूक झाली. महाराजांनी गिलगिट स्काउटच्या आदेशकांसहित, ब्रिटिश अधिकारी तसेच ठेवले. या अधिकाऱ्यांनी 31 ऑक्‍टोबर, 1947 रोजी कट करून, गव्हर्नरांना कैदेत टाकले. मेजर ब्राऊन ह्यांनी 3 नोव्हेंबर, 1947 रोजी पाकिस्तानी झेंडा फडकावला आणि प्रशासन पाकिस्तानच्या हाती सुपूर्त केले.
डिसेंबर 1947 पर्यंत स्कार्डू येथील छोटे पथक ताब्यात घेतले गेले आणि आदिवासींशी संगनमत करून, राज्यातील इतर भागांवर पाकिस्तानने ताबा मिळवला. पाकिस्तान समर्थक आदिवासी शायॉक आणि सिंधू खोऱ्यांपर्यंत पुढे आले. त्यांचे उद्दिष्ट लेह आणि अंतिमतः संपूर्ण लडाखवर कब्जा करण्याचे होते. लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा ह्यांच्या नेतृत्वाखालील, राज्याच्या सैन्यातील, स्कार्डूच्या पथकाने सहा महिने किल्ला लढवला. लेहपर्यंतची पाकिस्तानची प्रगती प्रलंबित करण्यात मोलाची मदत झाली.
जोझिलामार्गे पायी- लेहला राज्याच्या सैन्याच्या 33 माणसांच्या एका प्लॅटूनचे संरक्षण होते. त्यास कुमक देण्याची इतर कोणतीच शक्‍यता नसल्याने, मेजर पृथ्वीचंद आणि कॅप्टन खुशालचंद 2 डोग्रा आणि राज्याच्या सैन्याच्या 2 प्लॅटून्स यांना घेऊन 16 फेब्रुवारी, 1948 रोजी श्रीनगरहून जोझिलामार्गे पायीच रवाना झाले. हिवाळ्यात ते प्रथमच असे करत होते. ब्रिटिशांकरवी प्रशिक्षित लडाखचे पहिले अभियंत्रज्ञ सोनम नोर्बू हेही त्यांचेसोबत होते. लेह येथे धावपट्टी तयार करण्यासाठी त्यांच्यापाशी 13 हजार रुपये दिलेले होते. 8 मार्च, 1948 रोजी ते लेहला जाऊन पोहोचले. कुमक देण्याचा पर्यायी मार्ग हिमाचल प्रदेशाच्या रोहतांग खिंडीमार्गे मनालीहून होता. पण तो खूपच लांबचा होता आणि पायी पार करण्यास योग्य नव्हता. तोही हिवाळ्यात पूर्ण बंद असे.
कर्नल रिंचेन – मेजर पृथ्वीचंद यांनी 7-जे. अँड. के. लष्कर उभारण्यास सुरुवात केली. त्यात चेवांग रिंचेन नावाचा एक तरुण होता. पुढे जाऊन तो कर्नल चेवांग रिंचेन, महावीरचक्र अँड बार, सेना मेडल झाला. सिंधू खोऱ्याचा तळ आणि शहर यांच्यादरम्यान धावपट्टी बांधण्याचे काम 12 मार्च, 1948 रोजी सुरू झाले. 6 एप्रिल, 1948 रोजी अत्यंत परिश्रमपूर्वक 2 हजार 300 यार्डांची धावपट्टी बांधून तयार झालेली होती. कोणत्याही मापाने हे काम अत्यंत महत्त्वाचे होते. नोर्बू यांनी 10 हजार 891 रुपये खर्च केले होते. उर्वरित 2 हजार 109 रुपये त्यांनी सरकारी खजिन्यात जमा केले. 6 एप्रिल, 1948 रोजी त्यांनी विमाने आणि कुमक आता लगेचच पाठवू शकता, अशी विनंती करणारा एक बिनतारी संदेश पाठवला. 22 मे, 1948 पर्यंत सिंधू खोऱ्यातील लेहच्या बाहेरील भागातील जोझिला, कारगील, खाल्तसी आणि थारू यावर पाकिस्तानी आक्रमकांनी ताबा मिळवलेला होता. श्रीनगरपासूनचा खुष्कीचा मार्ग आता उपलब्ध नव्हता. शत्रू लेहच्या दरवाजावर उभा होता. कुमक पुरवण्याचा इतर कोणताही उपाय उपलब्ध नव्हता. लेह आता केवळ हवाई मार्गानेच वाचवता येणार होते.
पहिल्या विमानासोबत जनरल थिमय्या- मेजर जनरल थिमय्या यांनी एअर कमांडर मेहरसिंग, आदेशक, वायूदल, जे. अँड. के. ह्यांना मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पाचारण केले. लेहला वाचवण्याकरता वायूदलाची मदत करण्याची विनंती केली. मेहरसिंग यांनी स्पष्ट केले की, डाकोटा मालवाहू विमाने इतक्‍या उंचीवर चालवण्याकरता सक्षम नाहीत. या विमानात एअर प्रेशर कायम ठेवण्याकरता प्राणवायू नेण्याची सोयही नाही. विमानाची 18 हजार फुटांहून अधिक उंचीवर उडण्याची क्षमताही मर्यादितच आहे. मार्गावरील हवामानाची माहिती नाही आणि तिचे भाकीतही केले जाऊ शकत नाही. त्यावेळी वायूदलाकडे मालवाहू डाकोटा विमानाचे केवळ एकच स्क्वाड्रोन होते. ते काश्‍मीर आणि पूँछ भागातातील इतर मार्गावरही वापरले जात होते. त्यावर थिमय्या ह्यांनी पहिल्या विमानासोबत स्वतः जाण्याची आणि वायूदलासोबत धोका पत्करण्याची तयारी दर्शवली. त्यावर मेहरसिंग तयार झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःच पहिले विमान लेहला नेण्याचा निर्णय घेतला. हा त्या दोघांमधला करार होता. त्यास मुख्यालयाकडून अनुमती नव्हती. या दोन्ही सेनापतींचे त्यांनी घेतलेल्या धोक्‍यांकरता कौतुक केले पाहिजे. (क्रमशः)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.