साहित्यिक, कवींना प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटिसा 

पालघर पोलिसांचा प्रताप

पालघर – लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी सुरु असताना पालघर पोलिसांनी एक अनोखा प्रताप केला आहे. वसईतील प्रसिध्द साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी थेट प्रतिबंधात्मक आदेश असलेल्या नोटीस पाठवल्या आहेत. या निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून दखलपात्र किंवा अदखलपात्र अपराध घडण्याची शक्‍यता या नोटिशीत वर्तवली असून तसे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले आहे. यानंतर पालघर पोलिसांच्या या कारवाईवर टीकेची झोड उठली आहे.

वसईतील हरित वसईचे प्रणेते आणि वसईचं हरितपण टिकवण्यासाठी आंदोलन करणारे 78 वर्षीय मार्कुस डाबरे, ज्येष्ठ कवी सायमन मार्टीन, वसईचे माजी आमदार डॉमनिक गोन्सालवीस, वसईच्या सामाजिक चळवळीत कार्यकर्त्या डॉ. मणिका डाबरे यांनाही नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारी स्वरूपातील गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींविरोधात ज्या फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या जातात, त्या नोटिसा या लोकांनाही दिल्या आहेत. याबाबत स्वतः मार्कुस डाबरे यांच्यासह सर्वांनीच आश्‍चर्य व्यक्त केले आहे. पालघर पोलीस अंतर्गत वसई पोलिसांनी तालुक्‍यातील 804 जणांना, तर वसई शहरातील 110 जणांना अशा नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसा म्हणजे चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.