वाढदिवस साजरा न करण्याचा ना. रामराजेंचा निर्णय

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने आज रक्‍तदान शिबिर

फलटण – राज्यात व जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने वाढदिवस साजरा न करायचा निर्णय फलटण संस्थानचे अधिपती आणि विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतला आहे. त्यांचा उद्या (दि. 13) वाढदिवस असून, यानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

करोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे गुढीपाडव्यादिवशी होणारा माझा वाढदिवस साजरा करणार नाही. या दिवशी मी आपणाला प्रत्यक्षात भेटू शकत नाही. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, हीच माझी ताकद असून, करोनाच्या संकटात आपण सुरक्षित रहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.

पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर व्हॅक्‍सिनेशन करून घ्यावे. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करावे, असे आवाहन ना. रामराजे यांनी निवेदनाद्वारे जनतेला केले आहे. ते म्हणाले, कोविड-19 या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. फलटण तालुक्‍यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

या पार्श्वभूमीवर मी प्रशासनाला सूचना दिल्यानुसार नगरपरिषदेच्या सांस्कृतिक भवन येथील नवीन इमारतीत नव्याने शंभर बेडचे रुग्णालय तात्काळ उभे करण्यात आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आपण या महामारीचा मुकाबला यशस्वीपणे करू शकतो. दरम्यान, ना. रामराजेंच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुका व शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने उद्या, दि. 13 रोजी 10 वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिराशेजारी ब्लड बॅंकेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.