बंगळूर – आमदारांची फोडाफोडी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपने कर्नाटकची सत्ता मिळवली. त्यामुळे मुख्यमंत्री नव्हे; अवैध सरकारच हटवण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने कर्नाटकमधील राजकीय घडामोडींविषयी दिली.
कर्नाटकात नेतृत्वबदल करण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यानुसार, बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावरून कॉंग्रेसने सत्तारूढ भाजपवर निशाणा साधला. एका भ्रष्ट मुख्यमंत्र्याला हटवून दुसऱ्या भ्रष्ट नेत्याला मुख्यमंत्री केल्याने सामान्य जनतेचे कुठलेच हित साधले जाणार नाही.
विविध समस्यांनी जनता त्रस्त असताना भाजपकडून होणारे सत्तेचे राजकारण दुर्दैवी आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले. कर्नाटक कॉंग्रेसचे प्रभारी रणदीप सुर्जेवाला यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मोदींनी राजीनाम्याचा आदेश देऊन येडियुरप्पा यांचा अपमान केला. सक्तीच्या निवृत्तीच्या क्लबचे येडियुरप्पा यांना सदस्य बनवण्यात आले, असे ट्विट सुर्जेवाला यांनी केले.